भारताचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे निधन

0

कोलकाता – भारतीय फुटबॉलच्या सुवर्णकाळाचे साक्षिदार व देशाचे महान फुटबॉलपटू पी. के. बॅनर्जी यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते न्युमोनियाने त्रस्त होते व त्यांच्यावर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना पार्किन्सन, डीमेन्शिया व हृदयविकाराचाही त्रास होता. गेल्या 2 मार्चपासून ते कृत्रिम श्‍वसनप्रणालीवर होते.

पश्‍चिम बंगालमधील जलपैगुडीत 23 जून 1936 रोजी त्यांचा जन्म झाला होता. देशाच्या फुटबॉलचा दर्जा उंचावण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल केंद्र सरकारने 1961 साली अर्जुन पुरस्काराने तर, 1990 साली पद्मश्री पुरस्काराने गौरव केला होता. फिफाने 2004 साली त्यांचा विसाव्या शतकातील एक सर्वोत्तम फुटबॉलपटू म्हणून खास सत्कार केला होता. त्यांनी देशाकडून 84 आंतरराष्ट्रीय सामने खेळताना 65 गोल नोंदविले होते.

1962 सालच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे ते प्रमुख खेळाडू होते. 1960 साली झालेल्या रोम येथील स्पर्धेत त्यांनी फ्रान्सविरुद्धच्या लढतीत केलेल्या अफलातून गोलमुळे भारताने हा सामना 1-1 असा बरोबरीत सोडविला होता. 1956 सालच्या मेलबर्नमधील समर ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांच्याच कामगिरीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाचा 4-2 असा पराभव केला होता. सातत्याने दुखापती झाल्यामुळे त्यांनी 1967 साली फुटबॉलमधून निवृत्ती घेतली, मात्र ते संघटनात्मक पातळीवर जवळपास 51 वर्षे भारतीय फुटबॉलशी निगडीत राहिले. फिफाचा फेअर प्ले पुरस्कार मिळविणारे बॅनर्जी भारताचे एकमेव फुटबॉलपटू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.