1 जानेवारीपासून मोबाईल नंबरमध्ये जुडणार आणखी एक ‘अंक’; जाणून घ्या नवा नियम

0

मुंबई । 1 जानेवारीपासून देशातील लँडलाईनवरून मोबाईल फोनवर कॉल करण्यासाठी कॉल धारकांना लवकरच नंबरच्या सुरुवातीस ‘0’ जोडावा लागणार आहे, असा प्रस्तावच दूरसंचार विभागाने मंजूर केला आहे. ट्रायने मोबाईलवर कॉल करण्यासाठी 0 जोडण्याची केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडे शिफारस केली होती. अखेर ती शिफारस मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे भारतात मोबाइल फोनवरून कॉल करण्याचे नियम लवकरच बदलणार आहेत. देशातील टेलिकॉम विभागाने दूरसंचार कंपन्यांना नवीन यंत्रणा राबविण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत व्यवस्थेत आवश्यक ते बदल करण्यास सांगितले आहे.

टेलिकॉम रेग्युलेटर नियामक ट्रायने लँडलाईनवरून मोबाईलवर कॉलसाठी ‘0’ समाविष्ट करण्याची केलेली शिफारस विभागाने मान्य केली आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) 29 मे 2020 ला लँडलाईनवरून कॉलसाठी मोबाईल नंबरपूर्वी ‘शून्य’ लावण्याची शिफारस केली होती. ती मान्य करण्यात आल्यामुळे टेलिकॉम सर्व्हिस वापरकर्त्यांना अधिक नंबर तयार करण्याची सुविधा मिळू शकणार आहे.

लँडलाईनवरून मोबाईलवर नंबर डायल करण्याची पद्धत बदलण्यासाठी ट्रायच्या शिफारशी मान्य केल्या गेल्या असून, आता लँडलाइनवरून मोबाईलवर फोन करण्यासाठी आधी 0 जोडणे आवश्यक आहे. 20 नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकात दूरसंचार विभागाने ही माहिती दिली आहे. यामुळे मोबाइल आणि लँडलाईन सेवांसाठी पुरेसे नंबर नव्यानं तयार करणं सहजसोपं होणार आहे.

दूरसंचार कंपन्यांना सर्व लँडलाईन ग्राहकांना शून्य डायलिंग सुविधा उपलब्ध करून द्यावी लागेल. ही सुविधा सध्या आपल्या प्रदेशाबाहेर कॉल करण्यासाठी उपलब्ध आहे, अशी माहितीसुद्धा दूरसंचार विभागाने दिली आहे. टेलिकॉम कंपन्यांना ही नवीन यंत्रणा लागू करण्यासाठी 1 जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.