हिंगणघाट जळीत प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

0

नागपूर : हिंगणघाट जळीत प्रकरणातला आरोपी विकेश नगराळे याने बुधवारी नागपूर कारागृहात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे.

३ फेब्रुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास पीडितेवर हिंगणघाट येथील नंदोरी चौकात पेट्रोल टाकून जाळण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा नागपुरातील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी विकेश ऊर्फ विक्की नगराळे याला अटक केली. तो सध्या नागपूरमधल्या तुरुंगात आहे. दरम्यान, लोकांचा राग लक्षात घेता त्याला एका विशेष सेलमध्ये ठेवण्यात आलंय. इतर कैद्यांपासूनही त्याला धोका असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळे जेल प्रशासन खास काळजी घेत आहेत. त्याच्या हालचालींवरही पोलिसांची नजर आहे. मात्र असं असतानाही त्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती बाहेर आल्याने चिंता व्यक्त केली जातेय.

विकेश हा विशेष सेलमध्ये असतो. त्याला जे ब्लॅंकेट देण्यात आलेलं होतं. त्याचाच वापर करत त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच त्याने असा प्रयत्न केल्याचीही माहिती दिली जातेय. मात्र तुरुंग प्रशासनाने अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.