सीलबंद बाटलीतून घरपोच मद्य विक्रीच्या वेळा निश्चित

0

जळगाव :- सध्या संपूर्ण जगात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट सुरू आहे. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताच्यादृष्टीने शासनाने काही अटी व मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित केलेली आहे. त्यानुसार अवर सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई यांच्या आदेशानुसार नमुना एफएल-2, फॉर्म इ-2 व एफएलडब्ल्यू-2 मद्यविक्री अनुज्ञप्त्यामधून घरपोच (होम डिलिव्हरी) सेवा पुरवण्यास परवानगी देण्यात आलेली आहेत. तसेच नमुना सीएल-3 अनुज्ञप्तीमधुक फक्त सीलबंद बाटलीतून घरपोच प्रकाराने मद्य विक्री करता येणार असून त्यासाठी वेळा निश्चित केल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

मद्यविक्री अनुज्ञप्त्यांची विक्री सुरु करण्याच्या व बंद करण्याच्या वेळा

विदेशी मद्याचे ठोक विक्रेते (Fl-1) यांना सकाळी सात वाजेपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत. देशी मद्याचे ठोक विक्रेते (CL-2) सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत, तर परवाना कक्ष (FL-3), विदेशी मद्याचे किरकोळ विक्रेते (FL-2 संलग्न सीएल/एमएल/टीओडी-3) व देशी मद्याचे किरकोळ विक्रेते (CL-3)  यांना सोमवार ते रविवार सकाळी सात ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत फक्त होम डिलिव्हरी सुविधा देता येईल यासाठी ओळखपत्र बाळगणे अनिवार्य राहील.

तसेच जे परवाना कक्ष लॉजिंग निवास कक्षाशी संलग्न आहेत त्यांना त्यांच्या संकुलाअंतर्गत निवासी असलेल्या व्यक्तींना मद्य विक्री करता येईल. कोणत्याही परिस्थितीत मद्यविक्री दुकान उघडून किंवा पार्सल पद्धतीने दुकानातून ग्राहकास विक्री करता येणार नाही तसेच कोणत्याही परिस्थितीत ग्राहकास मद्यविक्री दुकानात भेट देता येणार नाही. या विक्रेत्यांव्यतिरिक्त इतर सर्व मद्यविक्रीच्या अनुज्ञप्ती 30 एप्रिल, 2021 पर्यंत बंद राहतील.

कोविड19 संसर्ग प्रतिबंधात्मक उपायोजनेतंर्गत शासनस्तरावर तसेच स्थानिक प्रशासनाद्वारे देण्यात आलेले व यापुढे दिले जाणारे सर्व निर्देश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे सर्व अनुज्ञप्तीधारकांना बंधनकारक असून त्यात कसूर झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.