सातगाव परिसरात ढगफुटीने हाहाकार

0

पाचोरा(प्रतिनिधी) : १६ रोजी गुरुवारी सकाळी सात वाजेपासूनच सातगांव (डोंगरी) ता. पाचोरा परिसरात पावसाला सुरुवात झाली. अनेक जण गुराढोरांना चारापाणी करीत असतांनाच पावसाने अक्राळ- विक्राळ रूप धारण केले. ढगफुटी सारखा मेघराजा बरसू लागला. सुरुवातीला शेतकऱ्यांना आनंद वाटला. मात्र पावसाचा जोर वाढत जाऊन पावसाने अक्राळ – विक्राळ रूप धारण केले.  अनेकांना चिंता वाटू लागली. पावसाचा वेग कमी होण्याऐवजी वाढतच होता. सतत पाच तास पाऊस बरसल्याने, अनेकांना नुकसानीची भीती वाटू लागली  गावा शेजारुन इंद्रायणी व दगडी नदी वाहते. दगडी नदीच्या काठावर तडवी वस्ती आहे. या नदीकाठी कडुबा भिकन होळेकर यांचे दोन एकर शेत असल्याने, त्या शेतात सहा क्विंटल आले व कपाशीचे पीक लागवड केलेले होते. नदीत पाणी बसत नसल्याने, नदीच्या  वळणावरून पुराने शेतात प्रवेश केला. शेतासह दोन्ही पिके वाहून गेली. सदर शेतकऱ्याच्या मते दिड लाखाच्यावर नुकसान झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शेजारीच अगदी नदीच्या काठावर रहिवासी वस्ती असल्याने, अनेकांच्या घरांमध्ये हे पाणी शिरले. नदी काठावर नभीशान शकील तडवी या महिलच्या घराला चारही बाजूने पाण्याच्या पुराने पाण्याने वेढा दिल्याने, सदर महिला आपल्या लहान लेकरांना जवळ धरून दोन तास बसून होती. आजूबाजूच्या लोकांनाही घराच्या दरवाजापर्यंत पुरामुळे पोहोचता येत नव्हते. सदर घराच्या भिंती सिमेंट मध्ये बांधलेल्या असल्याने, त्या पडल्या नाहीत. जर मातीने बांधलेल्या असत्या तर मोठा अनर्थ घडला असता. गुलाब हुसेन तडवी यांच्या घराच्या मागच्या दरवाजाने पाणी आत घुसून, पुढच्या दरवाज्यातून बाहेर निघून गेले. त्यामुळे भांडीकुंडी, धान्य वाहून गेले. मुन्नाबाई दादाभाऊ तडवी यांच्या घरात त्यांची सुनबाई डिलिव्हरीसाठी काही दिवस बाकी असताना, घरात झोपून होती. अचानक घरात पाणी शिरल्याने तिला उठता सुद्धा येत नव्हते. मात्र दुसऱ्या घरात असलेल्या तिच्या सासुबाईंनी तात्काळ तिचा हात धरून तिला गुडघाभर पाण्यातून बाहेर काढले. याच घरातून दोन बाजरीच्या गोण्या, भांडे वाहून गेले. निसार सुलेमान तडवी, अकबर रशिद तडवी, फरिद सुलेमान तडवी, फकीरा चाँदखाॅ तडवी, युनुस समशेर तडवी, यांच्या घरातही पाणी शिरले होते. तसेच वसंत पुंडलिक महालपुरे यांच्या शेतातील पाच एकर कपाशीचे पीक, दोन एकर सोयाबीन वाहून गेले. अजिंठा पर्वतावरून उगम पावणारी बामणी नदीचे पुराचे पाणी नदीत न बसल्याने, या नदीच्या पुराने वसंत महालपुरे यांच्या शेतात उडी घेऊन, पाच ते सात एकर शेत ओलांडून, दगडी नदीत प्रवेश केला. यामुळे दगडी नदीने रौद्र रूप धारण केले होते. म्हणूनच सदर वस्तीतील घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांचे संसार वाहून गेले.

Leave A Reply

Your email address will not be published.