साकळीसह परिसरात अति पावसाने खरीप हंगाम धोक्यात !

0

मनवेल, ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  

सध्याच्या दररोज येणाऱ्या मुसळधार पावसामुळे साकळीत व परिसरातील बागायती कपाशीच्या पिकाचे अतोनात नुकसान होत असून शेतकऱ्यांच्या घरात कापूस येणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरश: पाणी आले आहे. जेव्हा पिकांना पावसाची गरज होती तेव्हा तो आला नाही व आता पावसाची  गरज नाही तर पाऊस ठाण मांडून दररोज जोरदार हजेरी लावत आहे.

ह्या परिस्थितीमुळे परिसरातील संपूर्ण खरीप हंगाम धोक्यात आलेला असून ही शेती व्यंवसायाच्या दृष्टीने चिंतेची बाब बनली आहे. तसेच कापसासह, मका, सोयाबीन, उडीद-मुग तसेच ज्वारीचे पिकांची सुद्धा अति पावसामुळे मोठे नुकसान झालेले आहे. तरी अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी. अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

साकळीसह  परिसर हा कपाशी सह मका व इतर पिकांसाठी महत्त्वाचा असा शेतीपट्टा आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे.  ते शेतकरी उन्हाळा शेवटच्यादरम्यान बागायती कपाशी लावतात. त्यानंतर पावसास सुरुवात झाली की कपाशीचे पीक चांगले तरारते, मात्र यंदा जुलै व ऑगस्ट महिना जवळपास दीड ते दोन महिन्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने पिके उन्हाने चांगलीच होरपळली व त्यांची वाढ खुंटली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसात सुरुवात झाली तेव्हा अधून-मधून पडणाऱ्या पावसाच्या पाण्यावर बागायती व पावसाळी कपाशी व इतर पिके जगू लागली.  त्यानंतर शेतकऱ्याला वाटले की, आता थोडाफार का होईना हंगामा आताशी येईल अशी आशा होती.  मात्र ऐन बागायती कपाशी फुठली तेव्हा पावसाचा जोर आता चांगलाच वाढला आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीच्या कैर्‍या सडून खाली जमिनीवर पडत आहे तर फुटलेला कापूसही ओला होऊन खराब होत आहे.

पावसामुळे मजूरांना  कापूस वेचायला संधी मिळतच नसल्याने अति पावसामुळे काही शेतकऱ्यांच्या शेतातील फुटलेल्या कपाशीच्या बोंडावर ‘कोंब ‘  फुटायला सुरुवात झालेली आहे. असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे बागायती कपाशी उत्पादक शेतकरी पूर्णपणे संकटात सापडला आहे. त्याचप्रमाणे ज्वारीच्या कणसात दाणा भरत आला व आता पिक कापणीला येण्याच्या स्थितीत येत असतांना सध्याच्या अति पावसाने ज्वारी सुद्धा काळी पडायला व खराब व्हायला सुरुवात झालेली आहे. तसेच सुरुवातीला पाऊस नसल्याने पाण्याच्या कमतरतेमुळे मक्याचे पीक पूर्णपणे कुपोषित राहिले त्याला कीड लागले व अर्ध्यावर पीक संपलेले होते, तर आता अति पावसामुळे उरलेसुरले मका पीकही पूर्णपणे हातचे जात आहेत. या गंभीर परिस्थितीमुळे  परिसरातील शेतकरी पूर्णपणे हतबल झालेला आहे. परिसरात दि २८ रोजी तर रात्रभर संततधार व मुसळधार पाऊस पडला तसेच दररोज पाऊस अधूनमधून जोरदारपणे हजेरी लावत आहे.  त्यामुळे यंदाचा सर्व खरीप हंगाम अति पावसामुळे धोक्यात आलेला आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

शेतातील पिके उभे करण्यासाठी शेतकरी बँकांचे कर्ज, हात उसनवारी इतर माध्यमातून पैसा उभा करत असतो. मात्र यंदाचा खरीप हंगाम पुर्णतःवाया गेल्याने  शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बँकांची व इतर हात उसनवारीची देणी कशी करायची? ही चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

सरसकट नुकसानभरपाई मिळावी

अति पावसामुळे परिसरातील ज्या शेतकऱ्यांच्या  खरीप पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना शासनाकडून सरसकट नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. जर शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला तरच शेतकरी जगेल अशी गंभीर परिस्थिती परिसरातील शेतकऱ्यांची झालेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.