संतापजनक.. अल्‍पवयीन मुलीवर वृद्धाकडून अत्‍याचार

0

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क

धुळे येथील मोहाडी उपनगर येथील एका ११ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी वृद्ध संशयिताला ताब्यात घेतले आहे.

मोहाडी उपनगर येथील ११ वर्षीय मुलगी २ नोव्हेंबरला दुपारी एकला बोकडासाठी चारा घेऊन येते, असे सांगून घरातून बाहेर पडली. यावेळी संशयित शांताराम शिवराम अहिरे (वय ७१) याने रेल्वे पट्ट्याजवळ चारा तोडून देण्याचे आमिष दाखवत मुलीला सायकलीवर बसवून सावळदे (ता. धुळे) शिवारातील शेतात नेले. तेथे त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास पीडितेसह तिच्या आई- वडिलांना मारून टाकण्याची त्याने धमकी दिली. पीडित मुलगी घाबरून गेल्याने तिने घटनेबाबत वाच्यता केली नाही.

तिच्या पोटात दुखू लागल्याने सोमवारी तिने तिच्या आईला घटनेबाबत सांगितले. त्यानंतर तिच्या आईने सासूशी चर्चा केल्यानंतर सोमवारी (ता. ८) रात्री उशिरा मोहाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात संशयित शांताराम अहिरे याच्याविरुद्ध पोक्सोसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल झाला. यानंतर पोलिस उपअधीक्षक दिनकर पिंगळे, निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक एम. आय. मिर्झा यांनी घटनास्थळी भेट दिली. संशयिताला पोलिसांनी मंगळवारी (ता. ९) ताब्यात घेतले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.