शेतकऱ्यांच्या ‘भारत बंद’ला महाराष्ट्रात प्रतिसाद

0

मुंबई: केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांवरुन शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम आता देशभरात विविध ठिकाणी पाहायला मिळत आहे.  देशातील विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे.  या भारत बंदला महाराष्ट्रातही मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह अनेक पक्ष आणि संघटना आजच्या भारत बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज राज्यातील अनेक APMC मार्केट, आडत बंद राहणार आहेत. अनेक रिक्षा संघटना, ट्रक चालक-मालक संघटनाही या बंदमध्ये सहभागी झाल्यामुळे रस्ते आणि माल वाहतुकीवरही या बंदचा परिणाम पहायला मिळत आहे.

बुलडाण्यात स्वाभिमानीने रेल्वे रोखली

बुलडाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस मलकापूर इथं रोखून धरली. त्यावेळी पोलिस आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर केंद्र सरकारनं तात्काळ तोडगा काढावा यासाठी बुलडाण्यात स्वाभिमानीचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले.

नवी मुंबईतील APMC मार्केटमध्ये कडकडीत बंद

शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई APMC मार्केटमध्ये कडकडीत बंद पाहायला मिळत आहे. APMCमधील पाचही बाजारपेठा आज पूर्ण बंद ठेवण्यात आल्या आहेत. नव्या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांसह माथाडी कामगारांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे माथाडी कामगारही या बंदमध्ये सहभागी झाले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत आवक घटली

पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदचा परिणाम दिसून येत आहे. फळी आणि भाजीपाला घेऊन येणाऱ्या फक्त 174 गाड्यांचीच आवक आज झाल्याचं पाहायला मिळत आहे. रोज किमान 900 गाड्यांमधून इथं फळं आणि भाजीपाला येत असतो. त्यामुळे बाजार समितीमध्ये आज गर्दी पाहायला मिळत नाही. बाजार समितीमधील किराणा आणि भुसार मालाची बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. या बंदमध्ये हमालही सहभागी झाल्यामुळे मार्केटमध्ये शांतता दिसून येत आहे.

महाराष्ट्रात क्रमांक दोन वर असलेली पुण्याजवळील चाकण कृषी उत्पन्न बाजार समिती ही कडकडीत बंद आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भारत बंदची हाक देण्यात आलीये. त्याअनुषंगाने शेतकरी, व्यापारी आणि आडत्यांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे आज दोन कोटींची उलाढाल ठप्प असणार आहे.

दादरमध्ये सर्व मार्केट सुरु

दादरमध्ये सर्वकाही सुरुळीत सुरु असल्याचं चित्र आज सकाळी पाहायला मिळालं. दादरमधील भाजी मंडई, फुल मार्केट सुरु आहे. त्याचबरोबर रस्त्यांवर टॅक्सी आणि बसेसचा राबताही पाहायला मिळत आहे. सकाळपासूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त दादर परिसरात दिसत आहे.

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आज बंद

नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या आज बंद ठेवण्यात आल्या आहेत.  भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी सर्व व्यवहारही ठप्प आहेत.  लासलगाव, पिंपळगाव, नाशिक, मनमाड, देवाळा यासह इतर बाजार समितीमधील सर्व व्यवहार ठप्प आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.