शिवजयंतीची जळगावात ऐतिहासिक मिरवणूक

0

शिवाजी महाराजांना अपेक्षित तरुण आज हवाय!- ना. महाजन

जळगाव दि. 19-
देशातील पुलवामा येथे घडलेल्या आतंकवादी हल्ल्यानंतर आम्ही भारतीय खचलेलो नाहीत. आजचा शिवजयंतीचा महोत्सव राज्यात शांततेत शिस्तीत आम्ही पार पाडत आहोत. शिवाजी महाराजांना अपेक्षित असणारा तरुण आज हवाय, असे प्रतिपादन ना. गिरीश महाजन त्यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे आयोजित मिरवणुकीचे उद्घाटन ना. महाजन यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करुन मंगळवारी सकाळी 9 वा. झाले. यावेळी महापौर सिमा भोळे, आ. राजुमामा भोळे, आ. चंद्रकांत सोनवणे, आ. चंदूभाई पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जैन समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, गुलाबराव देवकर, डॉ. राधेश्याम चौधरी, विष्णू भंगाळे, शिवाजी भोईटे, गफ्फार मलीक, सुनिल नेरकर, पुरुषोत्तम चौधरी, शंभू पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथे शहिद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन उत्सव समितीचे शंभू पाटील यांनी केले.
 कोल्हापूरच्या संघाचे चित्तथरारक प्रदर्शन
खास शिवजयंतीसाठी आलेल्या कोल्हापूर येथील चमूने उपस्थितांना रोमहर्षक तलवारबाजी, दांडपट्टा, याचे चित्तथरारक प्रदर्शन करुन थक्क केले. यावेळी चौकाचौकात त्यांच्या प्रदर्शनाला नागरिकांनी चांगलीच दाद दिली.
र्ी छत्रपती मुस्लिमद्वेष्टे नव्हते
छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिमद्वेष्टे नव्हते. त्यांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार होते. त्यांचे अंगरक्षकातही मुस्लिम वीर होते. शिवरायांचे वकीलही मुस्लिम समाजाचे होते. शिवरायांचे कुतूबशहा नामक मुस्लिम शासकाशी मैत्रीचे संबंध होते. अशा माहितीचे प्रदर्शन मुस्लिम बिरादरीतर्फे न्यायालय चौकात लावण्यात आले होते. यावेळी अल्पसंख्यांक मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादीचे गफ्फार मलीक, फारुख शेख आदी उपस्थित होते.
 संदेसे आते है वर लेझिम नृत्य
पुलवामा घटनेच्या पार्श्वभूमीवर आव्हाणे येथील मनोज पाटील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थिनींनी संदेसे आते है या देशभक्तीपर गितावर लेझिम नृत्य करुन उपास्थितांना भारावून टाकले. तर भारतमातेचे रक्षण करताना सैनिकांचे दृश्य दाखवून देशप्रमाचा संदेश दिला. यावेळी बालशिवबाने माईकचा ताबा घेत शिवरायांवर मनोगत व्यक्त केले.
जेसीबीच्या सहाय्याने रोप मल्लखांब
जेसीबीच्या सहाय्याने पाटील शाळेच्या विद्यार्थिनींनी चौकाचौकात रोप मल्लखांबाचे चित्तथरारक प्रदर्शन चौका चौकात करुन उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकविला.
छत्रपती शिवाजी स्टेडियम येथून सुरु झालेली ही मिरवणुक स्टेट बँक चौक, बेंडाळे विद्यालय चौक, नेहरु चौकमार्गे टॉवर येथे दाखल झाली. तेथून चित्रा चौक जुने कोर्ट मार्गे शिवतीर्थ येथे मिरवणुकीची सांगता झाली.
शहर भगवामय
शिवजयंतीनिमित्त शहरात तरुणांतर्फे आपापल्या दुचाकीवर, रिक्षा, विविध वाहनांवर भगवा मिरविण्यात येत होता तर शहरातील विविध चौकात भगवे ध्वज लावण्यात आले होते. संध्याकाळी गणेश कॉलनी ते शिवतीर्थ या रस्त्यावरही काही मंडळांकडून शिवजयंती मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या पिंप्राळा, शिवाजीनगर, विविध कॉलन्यात बाळगोपाळांतर्फे शिवजयंतीनिमित्त मिरवणुकी काढण्यात आल्या होत्या.
 शिवतीर्थवर रक्तदान शिबीर
छत्रपती शिवरायांच्या 398 व्या जयंतीनिमित्त झेप फाऊंडेशन, बुलंद छावा, भ्रष्टाचार निवारण समिती आदी संघटनांकडून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते शिवप्रतिमा पूजन, दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी आ. राजुमामा भोळे, आ. चंदूलाल पटेल, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, संगिता निंबाळकर, आजी माजी नगरसेवकांची उपस्थिती होती. यावेळी माधवराव गोळवलकर रक्तपेढीच्या चमूकडून रक्तसंकलनाचे काम करण्यात येत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रमोद पाटील, अविनाश पाटील, आकाश साळुंखे, शुभम सुर्यवंशी, संदीप पाटील, संदीप मांडोळे, मुबारक तडवी, आमीन तडवी, गणेश वाघ, फरिद तडवी, सद्दाम तडवी, दिपक कदम आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शिवतीर्थ तसेच जिल्हान्यायालय चौकात आदर्श मराठा संघ, मुस्लिम संघटना, फिनिक्स संस्था आदींतर्फे थंड पाणी, सरबतचे वाटप करण्यात येत होते.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती पार्श्वभूमीवर शहर परिसरात वातावरण भगवेमय झाले होते. पुलवामा हल्ल्याचे सावट जयंतीच्या तयारीवरही दिसून येत असून जयंतीनिमित्त शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येवून दुचाकी रॅली, तसेच शिवाजी महाराजांच्या पराक्रमाच्या पोवाडयांनी देशभक्तीचे गीते पोवाडे सादरीकरण करण्यात आले. शिवसेनेसह अनेक मंडळांनी शिवजयंतीची मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती राजकीय पक्षांनी ती उत्साहात साजरा करण्याची तयारी केली होती. परंतु पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानंतर देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. ठिकठिकाणी व्यापार्‍यांनी बंद पुकारून भ्याड हल्ल्याचा निषेध केला. तर राजकीय पक्ष, सामाजिक-धार्मिक संघटना, शाळा-महाविद्यालये आदींकडून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन केले जात आहे. शिवजयंतीनिमित्त काही मंडळांनी वाढता दहशतवाद, शहीद जवानांना श्रद्धांजली असे देखावे सादर करण्याची तयारी केली. पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख चौक, रस्ते भगवेमय करण्याचे काम प्रगतिपथावर होते. तर जिल्हयाभरात देखिल तालुका ग्रामीण पातळीवर पोवाडयांनी राष्ट्रभक्ती जागविण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.