विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला ; पत्रकार परिषदेत अजित पवारांनी सोडले मौन

0

मुंबई : शिखर बँक प्रकरणात शरद पवार यांचा दुरान्वये काहीही संबंध नसतांनाही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या सगळ्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. पवारांवर गुन्हा दाखल केल्याने मी व्यथित झालो होतो. त्यामुळे मी माझ्या विवेकबुद्धीला स्मरुन राजीनामा दिला, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन आपलं म्हणणं मांडलं. यावेळी अजित पवार भावूक झाले.

आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात गेलेल्या राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपले मौन सोडले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदींसह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

शुक्रवारी मी अचानक राजीनामा दिला, त्यातून आमचे पक्षप्रमुख, नेते, कार्यकर्ते यांना सगळ्यांनाच वेदना झाल्या. त्यांना समजलंच नाही की मी राजीनामा का दिला? आता मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो जेव्हा अशी काही वेळ आली तर समजा मी पक्षातल्या लोकांशी बोललो असतो तर त्यांनी मला राजीनामा देऊ नका असंच सांगितलं असतं. ज्यांना मी न सांगता हे केलं त्यांची मी माफी मागतो असं अजित पवार यांनी सांगितलं. मी हरिभाऊ बागडेंना तीन दिवसांपूर्वी एक फोन केला होता आणि त्यांना विचारलं होतं की तुम्ही मुंबईत कधी असणार आहात? आम्ही सगळे शिखर बँकेत संचालक म्हणून काम करत होतो. आता निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्यामुळे ज्यांना वेदना झाल्या त्यांची सगळ्यांची मी माफी मागतो, असेही ते म्हणाले.

शिखर बँक प्रकरणात 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. ज्या बँकेच्या ठेवीच 12 हजार कोटीपर्यंत आहेत त्यात एवढ्या मोठ्या रकमेचा घोटाळा होईलच कसा? असाही प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला.

Leave A Reply

Your email address will not be published.