वर्षा राऊतांची ‘ईडी’कडून पुन्हा चौकशी होणार

0

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पुन्हा चौकशी होणार आहे. त्यासाठी ईडीने वर्षा राऊत यांना नवे समन्स पाठवले आहे. त्यानुसार वर्षा राऊत यांना 11 जानेवारील पुन्हा एकदा चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.

प्रवीण राऊत हे पंजाब-महाराष्ट्र सहकारी बँक (पीएमसी) घोटाळ्यातील आरोपी आहेत. प्रवीण राऊत यांच्याशी संजय व वर्षा राऊत यांचे आर्थिक संबंध असून, त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. त्याच संशयाच्या आधारे चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना २९ डिसेंबर रोजी चौकशीसाठी नोटिस बजावली होती. मात्र, त्यांनी ईडीकडे पत्र सादर करत चौकशीसाठी मुदत वाढवून देण्याची विनंती केली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना ५ जानेवारी रोजी नव्यानं समन्स बजावले होते. वर्षा राऊत त्याआधीच म्हणजे ४ जानेवारीला ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाल्या होत्या. परंतु, त्यावेळी चौकशी पूर्ण न झाल्यामुळं ईडीने पुन्हा एकदा वर्षा राऊत यांना समन्स बजावले असल्याचं समोर येतेय.

ईडीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमसी बँकेतील घोटाळ्याच्या तपासासंबधित वर्षा राऊत यांची सुमारे चार तास चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत यांनी कर्ज म्हणून दिलेले ५५ लाख रुपये नेमके कशासाठी घेण्यात आले? तसेच ते व्याजमुक्त कर्ज कशासाठी होते?, हा व्यवहार कसा होता? आदी प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. याखेरीज वर्षा राऊत यांचे आणखीही काही आर्थिक संबंध आहेत का?, याचीही ईडीकडून माहिती काढली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.