लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रच आजारी ; विविध ८ पदे रिक्त, आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण

0

लासुर ता.चोपडा(परेश पालीवाल)-चोपडा तालुक्यातील तिसऱ्या क्रमांकाचे गाव असलेल्या लासुर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचाऱ्यांचा कमतरतेमुळे आरोग्य प्रशासनावर अतिरिक्त ताण पडत आहे.लासुर प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध ८ पदे रिक्त असून त्वरित पदभरती होणे गरजेचे आहे.

लासुर गावाच्या लोकसंख्येच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचा अभावामुळे गावाची आरोग्य यंत्रणा खीळखिळी होतांना दिसत आहे.लासुर गावासह ६ उपकेंद्रांतर्गत परिसरातील १३ गाव यात चौगाव,चुंचाळे,मामलदे, मराठे,उत्तमनगर,सत्रासेंन, मोरचिडा,अमलवाडी,उमर्टी,गौऱ्यापाडा,कृष्णापुर,कर्जाणे आदी गावांसह ३ आदिवासी पाड्यांचा देखील समावेश आहे.एवढ्या गावांचा ‘लोड’ असतांना देखील पुरेसे कर्मचारी नसल्याने नागरिकांनाही पुरेशी सेवा देण्यात प्रा.आ.केंद्र काही अंशी असमर्थ ठरत आहेत.कोरोना काळात कमी मनुष्यबळ असतांना देखील लासुर गावावरील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यात प्रा.आ.केंद्राच्या कर्मचाऱ्यांना यश आले हे कौतुकास्पद आहे.

प्रा.आ.केंद्रात एकूण आरोग्य सेवकांची एकूण ६ पदे असून यापैकी लासुर उपकेंद्र क्र.२,चुंचाळे, सत्रासेन अशी ३ पदे रिक्त आहेत तसेच एकूण ७ आरोग्य सेविकांपैकी २ आरोग्य सेविका पद रिक्त आहे,आरोग्य सहाय्यक एकूण २ त्यापैकी १ रिक्त,प्रयोगशाळा तंत्रज्ञ एकही नाही,सफाई कामगार एकूण २ पैकी १ पद रिक्त अशी एकूण ८ पदांकरिता कर्मचाऱ्यांचा अभाव आहे.

कर्मचाऱ्यांचा पदभरती सोबतच प्रा.आ.केंद्रात १३ गावांचा कार्यभार असल्यामुळे याठिकाणी रात्रपाळीसाठी देखील आरोग्य सेवकांची तरी व्यवस्था व्हावी अशी अपेक्षा लासुर तसेच परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

लासुर प्राथमिक केंद्राच्या दरवर्षी रिक्त पदांची माहिती तालुका वैद्यकीय यंत्रणेमार्फत जळगाव जिल्हा प्रशासनास पुरवली जाते.सद्यस्थितीला प्रा.आ.केंद्रात विविध ८ पदे रिक्त असून कोरोना रोगाचा प्रादुर्भावामुळे यंत्रणेवर अतिरिक्त ताण जाणवत आहे-वैद्यकीय अधिकारी डॉ.दिनेश निळे

अशी आहेत रिक्त पदे-

आरोग्य सेवक ३ पद रिक्त (एकूण पदे-६)

आरोग्य सेविका-२ पद रिक्त (एकूण पदे-७)

आरोग्य सहाय्यक १ पद रिक्त (एकूण पदे २)

प्रयोगशाळा तंत्रज्ञ १ पद रिक्त (एकूण पदे-१)

सफाई कामगार १ पद रिक्त (एकूण पदे २)

Leave A Reply

Your email address will not be published.