रावेर लोकसभा मतदार संघात निर्माण झाली खरी ’चुरस’

0
raksha khdse ulhas patil

जामनेर : – रावेर, जळगाव, धुळे व नंदुरबार या खान्देशातील चार लोकसभा मतदार संघापैकी जळगाव मतदार संघ हा अमळनेरच्या भाजपा मेळाव्याच्या राड्यामुळे खुपच गाजला. त्याआधी भाजपाचे खा.ए.टी.पाटलांची अश्‍लिल व्हिडिओ क्लिप, तिकीट कापणे नंतर पुन्हा आ. स्मिताताईंना दिलेले तिकीट कापून चाळीसगावचे आ.उन्मेष पाटलांना देणे व अमळनेरच्या सभेतील मोठा राडा यामुळे जळगाव मतदार संघ खूप गाजला.त्यामानाने रावेर मतदार संघात एवढ्या भानगडी दिसत नाहीत.रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपा यावेळी नाराज नाथाभाऊंची सुन खा.रक्षाताई खडसेंना तिकीट देणार काय? हा प्रश्‍न खुप चर्चिला गेला.पण निवडणुकीच्या तोंडावर नाथाभाऊंची नाराजी नको म्हणून भाजपाने खा.रक्षाताईंना पुन्हा तिकीट दिले.

रावेर मतदार संघाची व भाजपाच्या उमेदवार खा.रक्षाताई खडसेंच्या संपुर्ण प्रचाराची धुरा नाथाभाऊंच्याच खांद्यावर आहे. परंतु त्यांची प्रकृती बरी नसल्याने ते काही दिवस रूग्णालयात दाखल झाले होते.उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी देखील ते उपस्थित राहू शकले नव्हते. त्यावेळची खा.रक्षाताईंची भावनिकस्थिती सर्वांनी बघितली आहे.मात्र आता नाथाभाऊंना रूग्णालयातून घरी सोडण्यात आलेले असून ते प्रचारासाठी मतदार संघात दाखल झाले आहेत.त्यामुळे भाजपाच्या प्रचार कार्यात आता वेग आला आहे. तरीही खा.रक्षा खडसे यांनी आधिच आपल्या प्रचार कार्यास प्रारंभ केला आहे.नाथाभाऊंच्या अनुपस्थितीत राज्याचे जलसंपदा तथा वैद्यकिय शिक्षण मंत्री मा.ना. गिरीश यांच्यासह त्या-त्या तालुक्यात पक्षाच्या पदाधिकार्‍यांनीच ही जबाबदारी सांभाळली होती.

उद्या दि.19 एप्रिल रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची अमळनेर, जळगाव व रावेर येथे जाहिर सभा होत आहे. राज्यात भाजपा सेना युती झाली असली तरी रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाचे काम करण्यास सेना बरीच नाखुष दिसून येत आहे. सेनेचे चंद्रकांत पाटील व नाथाभाऊंमधून तर विस्तव जात नाही हे सर्वश्रृतच आहे.अगदी राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेच्या चंद्रकांत पाटलांना त्यांच्या राष्ट्रवादीत घेवून तिकीट देवून खा.रक्षाताई खडसेंसमोर आव्हान उभे करण्यापर्यतचा विषयही चर्चिला गेला अशा स्थितीत शिवसेना ही आता खा.रक्षाताई खडसेंचे काम कितपत करेल? हा प्रश्‍न अनुतरीतच आहे.या पार्श्‍वभुमीवर शिवसेनेशी पॅचवर्कचे प्रयत्न झाले.खरे तर निवडणुकीपुर्वीच मुख्यमंत्र्यांनी खा.रक्षाताईंच्या कामाच्या बाबतीत भुसावळच्या सभेत कौतुक केल्याने तिकीटाचे संकेत मिळून गेले होते. त्यामुळे त्यांनी आधीच तयारी सुरु करून टाकली होती.त्यांच्या दृष्टीने मतदार संघात भाजपा सेनेची पकड चांगली असणे हा मोठी जमेची बाजू असून लेवा पाटील बहुसंख्य असणे हा देखील एक मोठा प्लस पॉईट आहे.गुजर फॅक्टर उपयुक्त आहे.

या मतदार संघात जामनेर,रावेर,मुक्ताईनगर, भुसावळ,मलकापुर या विधानसभेच्या पाच जागा भाजपाच्या ताब्यात आहेत.एक चोपड्याची जागाही शिवसेनेच्या ताब्यात आहे.म्हणजे सहाही विधानसभा मतदार संघ युतीच्याच ताब्यात आहेत.या लोकसभा मतदार संघात रावेरची एक नगरपालिका सोडली तर सर्वत्र भाजपा सेनेचीच सत्ता आहे.इतर स्थानिक स्वराज्य संस्थाही युतीच्याच वर्चस्वात आहेत.या पार्श्‍वभुमीवर खा.रक्षाताई खडसेंसाठी मार्ग सुकर असल्याचे म्हटले जाते.या पार्श्‍वभुमीवर रावेर लोकसभा मतदार संघात आघाडीमध्ये ही जागा प्रारंभी राष्ट्रवादीकडे गेलेली होती.पण खुप चाचपणी करूनही राष्ट्रवादीला येथे भक्कम उमेदवार मिळू शकला नव्हता.त्यामुळे राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडावी यासाठी खुप दिवस वाद आणि खेचातानी गाजली. राष्ट्रवादीने अगदी शिवसेनेचे चंद्रकांत पाटलांना व काँग्रेसच्या डॉ.उल्हास पाटलांना राष्ट्रवादीच्या तिकीटावर उभे राहण्याची ऑफर देवू केली होती.याबाबतच्या चर्चाही खुप दिवस चालल्या राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांपर्यंत विषय गाजला,जयवंतराव पाटलांनी जळगाव व्हिजिट केली. पण राष्ट्रवादीला ठोस उमेदवार देण्यात काही यश आले नाही. अखेर राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली.त्यानंतर माजी खासदार डॉ.उल्हास पाटलांनी येथे उमेदवारी दाखल केली.

1998 ला निवडुन गेल्यावर फक्त 13 महिने त्यांना खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती.त्यांनी 2014 मध्येही अपक्ष म्हणून लोकसभा निवडणुक लढविण्याचा अनुभव आहे.लेवा समाज फॅक्टर ही येथे महत्वाचा आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांना यावेळी राष्ट्रीय पक्षाचे तिकीट आहे.आघाडी घट्ट असल्याने राष्ट्रवादीवाले ही बर्‍यापैकी कामास लागले आहेत. राष्ट्रवादीमुळे लेवा समाजाच्या बरोबरीने मराठा समाजा कडुनही त्यांना अपेक्षा वाटतात.शिवाय अल्पसंख्यांक मतांवरही त्यांची भिस्त अवलंबून राहिल.वंचित बहुजन आघाडी फार मोठा प्रभाव पाडेल असे दिसत नाही.वरील तीन मोठे सामाजिक संख्याबळ, काँग्रेसची परंपरागत मते,त्यांच्या जोडीला डॉ.उल्हास पाटलांच्या धर्मार्थ रूग्णालयाच्या माध्यमातून जनतेला मिळालेली आरोग्य सेवा याबाबी त्यांची शक्ती स्थळे ठरणार आहेत.1998 मध्ये या रावेर व तेव्हाच्या जळगाव लोकसभा मतदार संघात डॉ.उल्हास पाटील हे काँग्रेसच्या तिकीटावर 3 लाख 39 हजार 980 मते घेवून विजयी झाले होते.मात्र पुढे तिन निवडणुकात लागोपाठ त्यांना पराभव पचवावा लागला होता.आता पाचव्यांदा ते नशिब आजमावत आहेत.त्यांचे सोशल इंजिनिअरींगचे गणित जर योग्य रितीने जमून गेले तर त्यांचीही विजयीश्री खेचून आणण्याची शक्यता नाकारता येणार नाही.डॉ.उल्हास पाटलांना खुप उशिरा तिकीट मिळाले. तयारीसाठी त्यांना कमी अवधी मिळाला आहे.त्यामुळे त्यांना अधिकची मेहनत घ्यावी लागणार हे स्पष्टच आहे.एकंदरीत रावेर लोकसभा मतदार संघात चुरस आकाराला येत आहे हे मात्र खरे!

Leave A Reply

Your email address will not be published.