राज्यातील 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर धावणार

0

पंढरपूर :- डिझेलच्या वाढत्या दरामुळे राज्य परिवहन महामंडळाला दरवर्षी कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतो. या आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी एसटी महामंडळाने 18 हजार बसेस ‘एलएनजी’वर करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महामंडळाला वर्षाकाठी 1 हजार कोटींचा फायदा होईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या यात्री निवास आणि नवीन स्थानकाचा भूमिपूजन समारंभ काल(दि.3) रावते व वारकरी संप्रदायातील प्रमुख विभूतींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रावते यांनी ही माहिती दिली.

डिझेल किमतीच्या चढउतारामुळे एसटी महामंडळाला दरवर्षी कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागतो. हा तोटा कमी करून एसटीला ऊर्जितावस्था आणण्यासाठी यापुढे ‘एलएनजी’वर एसटी बस चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 18 हजार एसटी बसेसमध्ये तांत्रिक बदल करावे लागणार आहेत. या बदलासाठी एका बसवर किमान 1 लाख 50 हजार रुपये खर्च करावा लागणार आहे. येत्या काही महिन्यांत राज्यातील विविध बस डेपोंमधील सुमारे 18 हजार एसटी बसमध्ये तांत्रिक बदल केले जातील. त्यानंतर एसटी बस एलएनजीवर धावतील, असे रावते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.