राजस्थानमध्ये बसपला धक्का ; ६ आमदारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0

नवी दिल्ली : राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसप)ला मोठा धक्का बसला आहे. सहा आमदारांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्या आमदारांनी शुक्रवारी येथे कॉंग्रेसचे औपचारिक सदस्यत्व स्वीकारण्याआधी त्या पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.

सोनियांच्या निवासस्थानी जाऊन बसप आमदारांनी त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी कॉंग्रेसला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचे स्पष्ट केले. त्या भेटीवेळी कॉंग्रेसचे राजस्थान प्रभारी अविनाश पांडे हेही उपस्थित होते. बसप आमदारांनी चार महिन्यांपूर्वीच राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारला पाठिंबा जाहीर केला.

त्यावेळी त्यांनी बसप विधिमंडळ पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करत असल्याची घोषणा केली. मात्र, राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनी घेतलेल्या आक्षेपामुळे ते विलिनीकरण रखडले. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्याला न कळवता बसप आमदारांना कॉंग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्याची भूमिका घेत पायलट यांनी त्यांची नाराजी उघड केली. त्यांच्या नाराजीमुळे बसप आमदारांचा कॉंग्रेस प्रवेश लांबणीवर पडला. अखेर पायलट यांची मनधरणी करण्यात पांडे यांना यश आले. त्यामुळे बसप आमदारांचा कॉंग्रेस प्रवेश मार्गी लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.