रस्ता नसल्याने पावसामुळे नाल्यामध्ये शेतकऱ्यांच्या फसल्या बैलगाड्या

0

मलकापुर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेतात जाण्यास सोयीचा व जवळचा तसेच सरकारी रस्ता असलेला रणगाव शिवारातील गट नं.४ मधील रस्ता हा तेथील शेतकऱ्यांनी  बंद केल्याने देवधाबा येथील शेतकऱ्यांना  शेतात ये-जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा याबाबत तात्काळ कार्यवाही करून सदर रस्ता मोकळा करून देण्यात यावा, अशी मागणी अर्जून वसंत उगले यांचेसह देवधाबा येथील गावकऱ्यांनी तहसीलदार मलकापूर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही देवधाबा येथील रहिवासी असून आमची शेती ही देवधाबा शिवारातच आहे. परंतु शेतीत जाण्यास व वहीवाटीस योग्य असा रस्ताच उपलब्ध नाही. शेतात जायचे असल्यास जीव मुठीत घेवून नाल्यामधून जावे लागते. गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नाल्याला पाणी आहे व बैलगाडी नेणे कठीण झाले आहे. त्यातच गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे नाल्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बैलगाड्या ह्या फसल्या आहेत.

शेतकऱ्यांना जवळचा, सोयीचा असा सरकारी रस्ता हा रणगाव शिवारातील गट नं.४ मधून आहे. मात्र तेथील शेतकरी हे जाण्या-येण्यास मनाई करीत असल्याने आम्हा शेतकऱ्यांसमोर  शेतात जावे तरी कसे असा प्रश्न उभा ठाकला आहे. तेव्हा याप्रकरणी आपण आपल्या स्तरावर योग्य ती चौकशी करून सरकारी नकाशाप्रमाणे जाण्या-येण्याचा व वहीवाटीचा हा रस्ता मोकळा करून द्यावा, अशी मागणी केली आहे. सदरचा प्रश्न मार्गी न लावल्यास ग्रामस्थ उपोषणास बसतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

सदर निवेदनावर अर्जून उगले, उमाकांत बोरले, दिलीप सोळंके, प्रमोद निळे, जगदीश बोरसे, भगवान सपकाळ, सुनिल सुरळकर, अशोक महाजन, विनोद बोरसे, शांताराम गुरचळ, रायबा निळे, योगेश भोंबे, सुनिल निळे, गणेश महाजन, शिवदास सुरळकर, राजेंंद्र बोरले, गजानन सुरळकर, भागवत सुरळकर, सागर सुरळकर यासह आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.