यावल न.पा.चे देशमुखवाड्यातील पाणीटंचाई तक्रारीकडे दुर्लक्ष

0

यावल :- नगरपरिषद कार्यालयापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या देशमुख वाड्यात तथा बसमळ्याजवळ तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. या भागातील गेल्या वर्षापासून तक्रार प्रलंबित असून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. पाणी पुरवठा विभाग प्रमुख पाणीपुरवठा सुरळीत करणे कामी निष्क्रिय ठरत असून याकडे नगराध्यक्षा सुरेखा कोळी व मुख्याधिकारी यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

संपूर्ण यावल शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. तसेच तापमानात वाढ होत असून अशा परिस्थितीत देशमुख वाड्यात तीन दिवसानंतर सुद्धा पाणीपुरवठा अनियमित आणि अल्प प्रमाणात होत आहे. 29 मार्च 2018 रोजी देशमुख वाड्यातील नागरिकांनी यावल नगरपरिषदेत लेखी तक्रार केली आहे. गेल्या वर्षभरात पाणीपुरवठा विभागाकडून पर्यायी व्यवस्था, दुरुस्ती, पाईपलाईन टाकण्याचे काम झालेले नसल्यामुळे सामाजिक भेदभाव केला जात आहे का? असा प्रश्न देशमुख वाड्यातील समाजबांधवांमध्ये उपस्थित केला जात आहे.

नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग प्रमुख व पाणीपुरवठा समिती सभापती, सदस्यांसह नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी लक्ष केंद्रित करून तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी अरविंद देशमुख, ऋषिकेश देशमुख, युवराज पाटील, सरला चौधरी, उमाकान्त चौधरी, अयुब खान, मनीषा चौधरी, मुरलीधर चौधरी, निर्मला चौधरी, सीताराम कोल्हे, विमल देशमुख, सुमित्रा देशमुख, शैलेश देशमुख, बाळू बावसकर, मंजुळा बावस्कर, कैलास चौधरी, गणेश पाटील, दिवाकर चौधरी, वसंतराव देशमुख, महेश कुरकुरे, अविनाश चौधरी, अनंता चौधरी, गिरीश देशमुख, यांनी स्वाक्षरी करून तक्रार केली आहे. दरम्यान यावल नगरपालिका काय कारवाई करणार, याकडे संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.