…म्हणून सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना घराजवळच केंद्र मिळणार

0

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) बोर्ड परीक्षांसाठी या वर्षी परीक्षा केंद्रांची संख्या दुप्पट वाढवली जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या घराच्या जवळच परीक्षा केंद्र मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बोर्डाचे परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी सांगितले की, बोर्ड मोठ्या संख्येत सर्व सुविधा असलेल्या परीक्षा केंद्रांचा शोध घेत आहे. ज्या भागांत मे-जूनमध्ये भीषण उन्हाळा असतो, तेथे ज्या शाळांत उन्हापासून बचावासाठी पुरेशा सुविधा असतील त्या शाळांतच परीक्षा केंद्र असेल. परीक्षेच्या तीन तासांत उष्ण वातावरणामुळे विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये हा त्यामागील हेतू आहे.

 

परीक्षा सुरू झाल्यानंतर १० व्या दिवशी म्हणजे १४ मेपासून पेपर तपासण्याची प्रक्रिया सुरू होईल. बोर्ड परीक्षांचे निकाल कुठल्याही स्थितीत १५ जुलैपर्यंत लागावेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. भारद्वाज यांनी सांगितले की, बराच विचार करून परीक्षेचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. जास्त उन्हाळा असलेल्या भागांत परीक्षा केंद्रांबाबत कुठलीही सूचना किंवा आक्षेप आला तर सीबीएसई त्यावर गांभीर्याने विचार करेल. तथापि, विद्यार्थ्यांची विशेष काळजी घेण्याचे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. कोरोनानंतरच्या स्थितीत बोर्ड परीक्षांसाठी सीबीएसई स्टॅँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर (एसओपी) तयार करत आहे. परीक्षा केंद्रांवर फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम लागू व्हावा यासाठी प्रत्येक वर्गात परीक्षार्थींची संख्या कमी केली जात आहे.

 

इतर सर्वच वर्गांच्या परीक्षा आणि निकाल ३१ मार्चपर्यंत लागेल

भारद्वाज म्हणाले, बोर्डाने ९वी व ११वी परीक्षांबाबत शाळांना निर्देश दिलेले नाहीत. तरीही शाळांना बोर्डाकडून काही मदत हवी असेल तर त्यांनी आम्हाला सांगावे. त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल. दहावी, बारावीशिवाय इतर सर्व वर्गांच्या परीक्षा व निकालांची प्रक्रिया ३१ मार्चच्या आधी पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.

 

परीक्षा केंद्रांसाठी काही सूचना आल्यास विचार करू

परीक्षा केंद्रांच्या निवडीसाठी अद्याप बराच अवधी आहे. कडक तापमानामुळे एखाद्या शाळेकडून केंद्राबाबत आक्षेप किंवा सूचना आली तर त्यावर गांभीर्याने विचार केला जाईल. – मनोज आहुजा, अध्यक्ष, सीबीएसई

Leave A Reply

Your email address will not be published.