मृदा व जलसंधारणातून ग्रामसमृध्दी राज्यातील अनोखा “अनोरे” पॅटर्न

0

अमळनेर(प्रतिनिधी)   तालुक्यातील अनोरे हे गाव बारामाही दुष्काळी गाव असून वर्षाचे बाराही महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर वर अवलंबून होते.गावातील लोक मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतरित  होतं होते.गावात एकूण ९२कुटूंब असून गावाची लोकसंख्या ४५० आहे.अनोरे हे गाव आर्डी -अनोरे  ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येत असून गावाचे क्षेत्रफळ ३६५ हेक्टर आहे. सन २०१८-१९ या वर्षी गावाने अमीर खान यांच्या पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सत्यमेव जयते वाॅटरकप स्पर्धेत भाग घेतला.अनोरे गावातील लोकांनी दार-बंद ग्रामसभा घेऊन स्पर्धेचे नियोजन केले.

त्यानंतर शिवार फेरीच्या माध्यमातून संपूर्ण गावाचा मृदा व जलसंधारणाचा संपूर्ण आराखडा तयार केला.गावातील प्रत्येक कुटुंबाने श्रमदानातून एका दिवसात १००% शोषखड्डे खोदले.प्रत्येक घरासमोर एक झाड लावण्यात आले.गावाच्या एकूण क्षेत्रफळापैकी १३५हेक्टर क्षेत्रावर यापूर्वी बांधबंदिस्ती करण्यात आली होती.स्पर्धेच्या कालावधीत आणखी १२५हेक्टर क्षेत्रावर बांधबंदिस्ती करण्यात आली.दहा हेक्टर क्षेत्रावर सलग समतल चर खोदण्यात आले.गावात पूर्वी १९ शेततळी होती.स्पर्धेदरम्यान आणखी १४ शेततळी यंत्राच्या साहाय्याने खोदण्यात आली.गावाच्या शिवारातील तीन नाल्यांचे यंत्राच्या सहाय्याने खोलीकरण व सरळीकरण करण्यात आले व पिचिंगचे काम श्रमदानातून करण्यात आले.गावातील तीन विहीरींचे भूजल पुनर्भरण करण्यात आले.

जळगाव जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री मा.चंद्रकांतदादा पाटील यांच्या निधीतून संपूर्ण गावातील घरांचे छतावरील पाण्याचे व्यवस्थापन करण्यात आले असून या पाण्याचा दैनंदिन वापरासोबतच शोषखड्ड्यांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यासाठी उपयोग झाला आहे.यामुळे गावातील हातपंपांची पाण्याची पातळी सुधारणा झाली असून बंद पडलेले हातपंप सुरू झाले आहेत.अनोरे गावाने मृदा व जलसंधारणाच्या विविध उपचारांच्या माध्यमातून २४कोटी लीटर साठवण क्षमता निर्माण केली. २०१९-२०या वर्षी चांगला पाऊस झाल्याने पहिल्या पावसातच सर्व शिवार पाणीमय झाले.मृदा व जलसंधारणाच्या विविध उपचारांच्या माध्यमातून भूगर्भातील पाण्याची पातळी सुधारण्यासाठी मदत झाली त्यामुळे विहीरींची पाण्याची पातळी वाढली आहे.मृदा व जलसंधारणाच्या माध्यमातून उपलब्ध पाण्याचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी अनोरे गावाने पाण्याचा ताळेबंद तयार केला असून गावात दर्शनीय भागात लावण्यात आला आहे.गावातील पाण्याच्या उपलब्धेमुळे पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटली असून गावातील २५०हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले असून दोनशे हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली  आहे.मागील वर्षी लाॅकडाउनच्या काळात अनोरे गावाने संपूर्ण अमळनेर तालुक्याला भाजीपाला पुरवला.

मागील वर्षी अनोरे गावाला भाजीपाला विक्रीतून सुमारे पंचवीस लाख रुपयाचे उत्पन्न मिळाले.गावातील दुधाचे संकलन दरदिवशी १००लीटरहून १०००-१२००लीटर पर्यंत वाढले आहे.गावातील निम्म्यापेक्षा जास्त कुटुंब दोन वर्षांतच लखपती झाली आहेत.गावातील तरूणांनी रोजगारासाठी बाहेरगावी स्थलांतर करणे थांबविले असून गावातच आधुनिक पद्धतीने शेती करण्याचा संकल्प केला आहे. गावातील कुटुंबांची गरज ओळखून अमळनेर पंचायत समितीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून सतरा लाभार्थ्यांना जनावरांचे गोठे मंजूर केले असून ९गोठ्यांचे काम प्रगतीपथावर आहे.भाजीपाला पिकवून  मोठ्या प्रमाणावर फायदा होत असल्याने यावर्षी ५०हेक्टर क्षेत्रावर भाजीपाला पिकविण्याचे नियोजन केले आहे.मागील वर्षी एका शेतकऱ्याने संत्रीची फळबाग लागवड केली असून यावर्षी चार ते पाच शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून फळबागेचे नियोजन केले आहे.कृषी विभागाच्या माध्यमातून गावातील सर्व ३३शेततळ्यांचे अस्तरीकरण करण्याचे नियोजन केले आहे.अनोरे गावाला पाणी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वाॅटरकप स्पर्धेत तिस-या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असून २०१९-२०२०या वर्षीचा पश्चिम विभागातून दुसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार जाहीर झाला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून

मृदा व जलसंधारणाच्या कामांच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता वाढविली व या पाण्याचा सुक्ष्म सिंचन पद्धतींचा प्रभावीपणे वापर करून आधुनिक पद्धतीने शेती केल्यास त्या माध्यमातून ग्रामीण भागात समृध्दी येईल व प्रत्येक कुटुंब लखपती होईल. यासाठी सर्व गावांनी प्रशासन व पाणी फाऊंडेशन सारख्या अशासकीय संस्था यांच्या मदतीने नियोजन करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

संदीप दिलीप वायाळ

सहायक गटविकास अधिकारी

पंचायत समिती अमळनेर

Leave A Reply

Your email address will not be published.