खासदार उन्मेष पाटील यांनीही वटवृक्ष लाऊन केला वाढदिवस साजरा

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) चाळीसगांव तालुक्यात ब्राम्हणशेवगे गावाची ओळख पर्यावरण समृध्द गाव अशी निर्माण करण्यासाठी गावातील पर्यावरणप्रेमी सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांच्या पुढाकाराने व सामाजिक वनिकरण विभागाच्या माध्यमातून ओसाड पडीक दहा हेक्टर क्षेत्रात पंचविस हजार झाडांचे वृक्षारोपण टप्प्याटप्प्याने होणार आहे. या ठिकाणी केंद्रीय भूजल विभागातील भुजलतज्ञ व सहज जलबोधकार म्हणून सुपरिचित उपेंद्रदादा धोंडे यांचे मार्गदर्शनाखाली जलसंधारणाचे त्रिस्तरीय उपचार करत निसर्ग बेट संकल्पनाही राबविण्यात येत आहे.

दि. २४ जून रोजी वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने या निसर्गटेकडी परिसरात महिलांनी आधी जोडीने वटवृक्ष लागवड केली व नंतर वटसावित्री पूजन करत समस्त महिलावर्गाला आपले सण व परंपरांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पर्यावरणसंवर्धनासाठी वापर करण्याचा सामाजिक संदेशच दिला आहे,

सामाजिक वनीकरण विभाग, लोकनायक स्व. तात्यासाहेब महेंद्रसिंग राजपूत प्रतिष्ठान संचलित हिरकणी महिला मंडळ व जलमित्र परिवाराने संयुक्तपणे या अभिनव उपक्रमाचे आयोजन केलेले होते. या उपक्रमासाठी हिरकणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुचित्राताई पाटील यांच्यातर्फे ३० वटवृक्ष भेट देण्यात आले होते. याप्रसंगी जळगांव लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री.उन्मेषदादा पाटील व तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री. नंदकुमार वाळेकर हेही सपत्नीक उपस्थित होते. जलमित्र परिवारातर्फे सदस्यांचे वाढदिवस केक कापून साजरा न करता वृक्षारोपण करत साजरा केले जात आहेत व योगायोगाने खासदारसाहेबांचाही आज वाढदिवस असल्याने त्यांनीही निसर्गटेकडीवर वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण केले. तसेच सामाजिक वनीकरण व विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून तयार होत असलेल्या या टेकडीसाठी त्यांनी ध्यानकेंद्र निर्माण करून देण्याचीही घोषणा याठिकाणी केली.

याप्रसंगी विभागीय वनअधिकारी साळुंखे साहेब, वनक्षेत्रपाल अमित पाटील साहेब,पंचायत समितीचे उपसभापती,विस्तार अधिकारी, जलमित्र परिवार, हिरकणी महिला मंडळ, किमया गृपचे सदस्य तसेच ब्राम्हणशेवगे येथील मा. सरपंच दत्तात्रय पवार, कांतीलाल राठोड, बद्रीनाथ राठोड, शांताराम नेरकर, रत्नाकर पाटील, सुभाष बाविस्कर,नाना माळी, संजय बाविस्कर, सचिन पवार, पिना दाभाडे, नाना पाटील, राजेंद्र माळी, तुषार माळी, कांतीलाल चव्हाण तसेच सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक वनीकरणचे सर्व अधिकारी, कर्मचारी, हिरकणी महिला मंडळ व जलमित्र परिवाराचे प्रा. आर.एम.पाटील, सविताताई राजपूत, शशांक अहिरे, कुणाल रुईकर,राहूल पाटील यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोमनाथ माळी यांनी तर सुत्रसंचालन सविताताई राजपुत, शिघ्र कवी रमेश पोतदार, वाय.टी.पाटील यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.