माजी मंत्री खडसे-जैन गटातील राजकीय वादाला पुन्हा सुरुवात

0

जळगाव जिल्ह्यातील राजकारणात एकनाथराव खडसे आणि माजी मंत्री सुरेशदादा जैन तसेच माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यात राजकारणातील वाद तसा जुना आहे. एकनाथराव खडसे यांचे सुपूत्र निखिल खडसे आणि ईश्वरलाल जैन यांचे पुत्र मनिष जैन यांच्या विधानपरिषदेसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत निखिल खडसेंचा पराभव करून मनिष जैन विजयी झाले होते. या निवडणुकीत माजी मंत्री सुरेशदादा जैन यांचा मनिष जैन यांच्या विजयात सिंहाचा वाटा होता. तेव्हापासून खडसे- जैन यांच्यातील वाद शिगेला पेटला होता. त्यानंतर सुरेादादा जैन यांच्यावर मनपा घरकुल घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झाली साडेचार महिने ते कारागृहात राहिले. ईवरलाल जैन यांचे पुत्र व माजी आमदार मनिष जैन हे अध्यक्ष असलेल्या महावीर सहकारी पतपेढीतील घोटाळा समोर आला. ती पतपेढी बंद पडली. या पतपेढीच्यावतीने जिल्हा बँकेकडून सन 2002 मध्ये कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परतफेडीसाठी जिल्हा बँकेला पतपेढीतर्फे चेक देण्यात आला होता. तो चेक वटला नाही म्हणून जिल्हा बँकेतर्फे न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा निकाल नुकताच बँकेच्या बाजूने लागला महावीर पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून त्या मालत्तेचा लिलाव करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. कारण संचालकांनी त्याची हमी दिलेली होती. तब्बल 15 वर्षानंतर महावीर पतसंस्थेच्या संचालकांच्या मालमत्तेवर टाच आली असल्याने त्याबद्दल जिल्ह्यात पुन्हा जोरदार चर्चेला उधाण आलेले आहे.

सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन रोहिणीताई खडसे- खेवलकर या एकनाथराव खडसे यांच्या कन्याच आहेत तसेच संचालक मंडळातील बहुसंख्य संचालक हे एकनाथराव खडसे यांचे गटाचे असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर एकनाथराव खडसे यांचे वर्चस्व आहे. बँकेच्या संचालक मंडळात स्वत: एकनाथराव खडसे आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे सुद्धा संचालक जलसंपदामंत्री भाजपचे संकटमोचक समजले जात असले तरी जिल्हा बँकेत मात्र त्यांचे काही चालत नाही. कारण एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई सुतगिरणीला 50 कोटीचे कर्ज जिल्हा बँक संचालक मंडळाने मंजूर केले होते. त्यावेळी त्यालाविरोध करणार्याात जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे होते. तरी सुद्धा 50 कोटींचे ते कर्ज मंजूर झाले. त्यात एकनाथराव खडसे यांनी बाजी मारली. जिल्हा बँकेतील प्रत्येक निर्णयात एकनाथराव खडसे गटाचे वर्चस्व असते हे मात्र निश्चित. महावीर पतसंस्थेच्या विरोधात न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर बँक संचालक मंडळात चर्चा झाली. संचालक मंडलाच्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात संचालक मंडळाकडून ही माहिती पत्रकारांना देण्यात आली. ही माहिती पत्रकारांना देतांना बँकेचे चेअरमन व्हा चेअरमन, कार्यकारी संचालक आणि इतर सर्व संचालक उपस्थित होते. परंतु सर्व वृत्तपत्रात पत्रकार परिषदेत एकनाथराव खडसे यांनी ही माहिती दिली असेच प्रकाशित झाले. बँकेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन अथवा संचालक मंडळाच्यावतीने ही माहिती देण्यात आली असे बातमीत यायलाहवे होते. परंतु या प्रकरणाची इत्यंभूत माहिती अथवा अभ्यास एकनाथराव खडसे यांना असल्याने पत्रकारांना माहिती दिली. परंतु योगायोगाने जैन गट आणि खडसे यांच्यात वाद असल्याने त्याला राजकीय स्वरूप प्राप्त झाले. वास्तविक संचालक मंडळाच्या बैठकीनंतर नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेतली जाते आणि पत्रकारांना माहिती दिली जाते.

सदर महावीर पतसंस्थेच्या संदर्भात वृत्तांत वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबाबतची माहिती एकनाथराव खडसे यांनी जाणीवपूर्वक दिली असा अर्थ तत्काळ वाचकांतर्फे काढला गेला. या वृत्तासंदर्भात महावीर पतसंस्थेचे तत्कालीन अध्यक्ष माजी आमदार मनीष जैन यांनी जी प्रतिक्रिया दिली त्यात त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करण्यास असमर्थता दर्शविली असली तरी यामागे राजकीय सूडाची भावना असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे त्याला राजकारणाचा वास येत असला तरी जिल्हा बँकेच्या हितासाठी संचालक मंडळाला निर्णय घेणे भाग आहे. राजकारण म्हटले की आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी प्रत्येकजण एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे एकनाथराव खडसे यांना आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या संदर्भत जर संधी मिळाली तर ते सोडतील कशी? मनिष जैन यांना तशी संधी मिळाली असती तर ते सुद्धा त्याचा फायदा घेतलेच असते. एकंदरित जळगाव जिल्ह्यात पुन्हा खडसे- जैन या गटातील वादाला तोंड फुटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.