माजी आदिवासी मंत्री विष्णु सावरा यांचे निधन

0

मुंबई – राज्याच्या आदिवासी विकास खात्याचे माजी मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे आदिवासी क्षेत्रात कार्य करणारे आघाडीचे नेते विष्णु सावरा (वय 72) यांचे आज संध्याकाळी निधन झाले. गेले दोन वर्ष ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते.

 

वर्ष 1995 च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला. अवघे सहा महिने मिळालेल्या मंत्रीपदातून त्यांनी अनेक विकासाची कामे केली.राज्यातील शंभरहून अधिक आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. विक्रमगड तालुक्‍याची निर्मिती, वाडा येथील के.व्ही. क्षमतेचे विद्युत उपकेंद्र, वाडा एसटी आगाराची निर्मिती, वाडा, विक्रमगड मध्ये आयटीआय कॉलेज, निंबवली, केळठण, तिळसा, ब्राम्हणगांव, उंबरखांड, शिरगाव येथील पुलांची कामे अशा अनेक कामांसोबत आदिवासी भागात प्रत्येक गावाला जोडणा-या रस्त्यांचे डांबरीकरण, पिण्याच्या पाण्याच्या योजना, समाजगृहे अशी अनेक कामे त्यांनी केली.

 

वर्ष 1990 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना भाजपाने वाडा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय प्राप्त करुन आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण केले. या निवडणुकी नंतर झालेल्या सन पर्यंतच्या सर्व विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवून सातत्याने सहावेळा विजयी होण्याचा सन्मान मिळविला.

 

वर्ष 2014 मध्ये भाजपा सरकार मध्ये त्यांच्यावर पुन्हा आदिवासी विकास खात्याच्या मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री होण्याचाही त्यांना सन्मान मिळाला. मंत्री झाल्यावर त्यांनी सर्वांबरोबर अतिशय नम्रतेने वागून आपल्या स्वभावाची एक वेगळीच छाप पाडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.