महापालिकेला कचरामुक्तीचा आश्चर्यकारक पुरस्कार !

0

केंद्रशासनाच्यावतीने स्वच्छ भारत अभियानातंर्गत देशातील शहरांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्याच्या योजनेत जळगाव व शहर महापालिकेला कचरामुक्तीचा थ्रीस्टार पुरस्कार मिळाल्याचे घोषित झाल्यानंतर जळगावातील प्रत्येक नागरिकाला आश्चर्याचा धक्काच बसला. परंतु काल राष्ट्रपती रामनाथ कोविद यांचे हस्ते जळगावच्या महापौर सौ.जयश्री महाजन यांनी राजधानी नवी दिल्लीत प्रत्यक्षात कचरामुक्तीचा पुरस्कार स्विकारला तेव्हा विश्वासच बसला. कारण गेले तीन वर्षापासून शहर स्वच्छतेचा ठेका घेतलेल्या वॉटर ग्रेस कंपनीविषयी अनेक तक्रारी नागरिकांकडून तर करण्यात आल्याच परंतु खुद्द नगरसेवकांकडून या कंपनीच्या कामकाजाबाबत अनेक वेळा महासभेत तसेच महासभेच्या बाहेर हल्लाबोल करण्यात आला.

वाढत्या तक्रारीवरुन वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यापर्यंत प्रशासनाने कारवाईचा बडगा दाखवला होता. त्यानंतर काही प्रमाणात वॉटरग्रेस कंपनीच्या कामात सुधारणा झाली असली तरी अजूनही नागरिक समाधानी नाहीत. प्रत्येक कॉलन्या मधील घरोघरी जाऊन घंटागाड्या कचरा गोळा करतात. परंतु त्या गाड्यांच्या वेळांमध्ये नियमितता नसल्याच्या तक्रारी आहेत. त्या तक्रारी वारंवार नागरिकांनी केल्यामुळे अलिकडे त्यात सुधारणा दिसून येते. तथापि, अनेक ठिकाणी कचरा इतरत्र पडलेला दिसून येतो. त्यामुळे असा काय चमत्कार झाला की, जळगाव महानगरपालिकेला कचरा मुक्तीचा पुरस्कार मिळू शकला असो.

कचरामुक्तीचा पुरस्कार मिळाल्याने महापालिकेच्या गतीमान पारदर्शक प्रशासनाचे कौतुक झाले ही बाब चांगली म्हणता येईल. परंतु जळगाव शहरवासियांच्या मनात मात्र महापालिकेच्या स्वच्छता विभागातील मनात खदखद कायम आहे. भारत सरकारने स्वच्छ भारत अभियानातांर्गत एकूण 4 हजार 320 शहरांचा सर्व्हे केला होता. त्यापैकी 2 हजार 238 शहरे या सर्व्हेमधून पुरस्कारासाठी पात्र ठरली. त्यापैकी प्रथम क्रमांकाचे कचरा मुक्तीचे पुरस्कार मिळविणाऱ्या म्हणजे 5 स्टार पुरस्कारांत एकूण देशातील फक्त 9 शहराचा समावेश आहे. त्यानंतर 3 स्टारचा पुरस्कार मिळविणाऱ्या शहरांमध्ये एकूण 143 शहरांचा समावेश आहे. बाकी 1 स्टार म्हणजे तिसऱ्या कामांचा पुरस्कार मिळविणाऱ्यात 147 शहरांचा समावेश आहे. याचा अर्थ जळगाव दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळविणारे शहर होय.

काल नवी दिल्लीत जळगावच्या महापौर सौ. जयश्री महाजन यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते थ्रीस्टार कचरा मुक्तीचा पुरस्कार स्विकारला तेव्हा जळगाव शहराच्या प्रथम नागरिक सौ.जयश्री महाजन यांना आनंद होणे साहजिक आहे. हा पुरस्कार स्विकारतांना जळगावकरांच्यावतीने त्यांनी स्वाभीमान होणे साहजिक आहे. कारण राष्ट्रपतीच्या हस्ते हा पुरस्कार दिला गेल्या तेव्हा देशातील 2 हजार 238 शहराचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच या पुरस्कार वितरण सोहळ्याला छत्तीसगडचे नागरी प्रशासन आणि विकास राज्यमंत्री डॉ. शिवकुमार डहरीय तसेच स्वच्छता भारत अभियानाच्या सचिव श्रीमती रुपा मिश्रा या उपस्थित होत्या. त्यामुळे देशपातळीवर जळगाव शहराचा ज्या महाराष्ट्र राज्यात बिगर भाजप सरकार आहे आणि जळगाव महानगरपालिकेतसुध्दा बिगर भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पुरस्कार मिळाल्याचे कौतुक जरूर जळगावकरांना असणार ही बाब निश्चित तथापि या थ्रीस्टार कचरा मुक्तीच्या पुरस्काराला जळगाव महापालिका प्रशासन कितपत खरी उतरते. हा नंतरचा भाग आहे.

कचरामुक्तीचा पुरस्कार जळगाव महापालिकेला मिळाला हे जरी कौतुकास्पद असले तरी ते प्रमाणपत्राच्या माध्यमातून होय. परंतु जळगाव शहरवासियांचे प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. ते त्यांनी मिळवावे हीच अपेक्षा. शहरातील खड्डेमुक्त रस्त्यांमुळे शहरवासिय हैराण असतांना खड्यामुळे काही जणांचा बळी गेला असतांना धूळ आणि खड्डे यातून बिकट वाट काढणाऱ्या जळगावकरांना स्वच्छतेच्या संदर्भातील पुरस्कार मिळाल्याचा सुखर धक्का असला तरी जळगावकर या पुरस्काराने कितपत सामधानी आहेत हे समजवे अत्यंत कठीण बाब म्हणावी लागेल. तरीसुध्दा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांच्या उत्साहाचे प्रोत्साहन घेवून जळगावकरांसाठी आणखी काही तरी चांगले करण्याची इर्षा महापालिका प्रशासनाने बाळगली तरी फार झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.