मरकजच्या मेळावाला परवानगीच का दिली?- शरद पवार

0

मुंबई । देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना अशा परिस्थितीत दिल्लीत मरकजचा धार्मिक मेळावा व्हायला नको होता. महाराष्ट्र सरकारने जशी मरकजच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, तशीच दिल्लीतही परवानगी नाकारायला हवी होती. दिल्लीत थोडी खबरदारी घेतली असती तर बरंच नियंत्रण आलं असतं, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुकवरून राज्यातील जनतेशी संवाद साधताना म्हटलं आहे.

राज्यातील जनतेशी संवाद साधताना वृत्तवाहिन्यांच्या बेजबाबदारपणावरही शरद पवार यांनी बोट ठेवलं. दिल्लीत खबरदारी घेतली असती तर वृत्तवाहिन्यांवरून एखाद्या वर्गाचं वारंवारं वेगळ चित्रं निर्माण केलं गेलं नसतं. एखाद्या वर्गाचं असं चित्रं निर्माण करून त्यात सांप्रदायिक भर घालण्याची संधी वृत्तवाहिन्यांना मिळाली नसती, असं सांगतानाच दिल्लीत जे घडलं ते रोज दाखवण्याची गरज आहे का? त्यातून आपण कोणती परिस्थिती निर्माण करू पाहतोय, याचा विचार वृत्तवाहिन्यांनी करण्याची गरज आहे, असं परखड मत पवार यांनी व्यक्त केलं. सामाजिक समतोल ढासळेल आणि कटुता वाढणार नाही, याची काळजी घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

पवार यांनी यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसेजवरही चिंता व्यक्त केली. सध्याच्या संकटाच्या परिस्थितीत एकत्र राहण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत कटुता, संशय वाढेल अशी स्थिती निर्माण होऊ न देण्याची गरज आहे. मी टीव्हीवर जे काही पाहतो व्हॉट्सअपवर येणारे मेसेज चिंता निर्माण करणारे आहेत. काही मेसेजची तपासण केल्यानंतर लक्षात आलं की, पाच पैकी चार मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. आणि वास्तव पुढं आलं तर वारंवार त्याची मांडणी करुन त्याबद्दल एक प्रकारचा गैरसमज निर्माण केला जात आहे. हे कुणी मुद्दामून करत आहे का याबद्दल शंका वाटते, असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं.

Leave A Reply

Your email address will not be published.