मनपा प्रशासनाची प्लॅस्टिकवर जम्बो कारवाई

0

जळगाव दि. 26-
राज्यात प्लॅस्टिक बंदी असताना शहरात अवैधपणे विक्री होणार्‍या प्लॅस्टिकवर मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्या आदेशाने छापे टाकत मनपा प्रशासनाने बळीराम पेठ, पोलन पेठ, सिंधी कॉलनी, महाबळ या परिसरात अंदाजे 4 लाखाचा तीन क्विंटल माल जप्त केला. संबंधितांना 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला. मनपाची कारवाई शहरात दिवसभर सुरुच होती. प्रशासनाच्या धडक कारवाईने एकच खळबळ उडाली.
मनपाच्या एका पथकाला अवैध प्लॅस्टीकची वाहतूक होत असल्याची खबर मिळाल्यावर पथकातील जितेंद्र किरंगे व दिनेश गोयर यांनी पाठलाग करत बळीराम पेठेतील श्रीराम प्लॅस्टिक या गोडावूनवर पथकाने दुपारी दीड वाजता छापा टाकला. येथील कारवाईत गोडावूनमध्ये ठेवलेले प्लॅस्टीक ग्लास, पेले, चमचे, डीशेस जप्त केल्या. तसेच पथकाद्वारे पोलन पेठेतील आनंद प्लास्टीक या गोडावूनवरही कारवाई करण्यात आली. या कारवाईत
एस. बी. बडगुजर, हितेंद्र किरंगे, रमेश कांबळे, दिनेश गोयर, डी.डी. गोगले, प्रविण पवार व मुकाद व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला.
कारवाई चालूच राहणार
शहरात प्लॅस्टीक बंदीची कारवाई सुरुच राहणार असल्याची माहिती मनपा सुत्रांनी दिली.प्लॅस्टीक बंदी असताना वापरणार्‍यावर 5 हजार दंडाची तरतूद आहे. त्यानंतर पुन्हा विक्री करताना आढळल्यास 10 हजाराचा दंड ठोठावण्यात येतो. पुन्हा तिसर्‍यांदा विक्री आढळून आल्यास 25 हजाराच्या दंडासह कारावासही होवू शकतो, अशी माहिती जाणकारांनी दिली.

सिंधी कॉलनीत 22 हजार 800चा माल जप्त
मनपा प्रशासनाच्या दुसर्‍या पथकाने सिंधी कॉलनी परिसरात छापे टाकून अंदाजे 22 हजार 800 रुपयांचा माल जप्त केला. बाबा ट्रेडर्स, अमृतकर प्रोव्हिजन, गणेश प्रोव्हिजन, कापडिया प्रोव्हिजन, परिसरातील हातगाडी धारक, भाजीपाला व फळविक्रेते यांच्याकडील प्लॅस्टीक कॅरीबॅग्ज जप्त करण्यात आल्या. सदर कारवाईत आरोग्य अधिक्षक एच. एम. खान, एल.बी. धांडे, के. के. बडगुजर, एस. के. खान, एस. एच. ढंढोरे, ए. के. सोनवाल, ए. के. सोनवाल, के. आर. बारसे, विशाल वानखेडे यांनी सहभाग घेतला. एका पथकाने महाबळ परिसरात कारवाई केली असून त्याचा तपशील समजू शकला नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.