मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन

0

भोपाळ : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन झाले आहे. प्रकृती खालावल्याने गेले काही दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज सकाळी ५.३० च्या सुमारास लालजी टंडन यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८५ वर्षांचे होते. लालजी टंडन यांच्यावर लखनऊच्या गुलाला घाट येथे आज सायंकाळी ४.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील अशी माहिती आशुतोष टंडन यांनी दिली.

लालजी टंडन हे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे खंदे समर्थक मानले जात असत. 1978–84 या कालावधीत ते उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे सदस्य होते. तर 1996 ते 2009 दरम्यान सलग तीन वेळा ते विधानसभेवर निवडून आले. बसप-भाजप युती सरकारमध्ये मायावतींच्या नेतृत्वात त्यांनी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात नगरविकास मंत्री म्हणूनही काम पाहिले होते.

लालजी टंडन यांनी 2009 मध्ये लखनौ मतदारसंघातून काँग्रेस नेत्या रिता बहुगुणा जोशी यांचा 40 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. ही जागा अटल बिहारी वाजपेयी यांनी 1991 पासून सलग चार वेळा राखली होती. लालजी टंडन यांनी बिहारचे राज्यपालपदही भूषवले आहे.

लालजी टंडन यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवल्याची माहिती लखनऊमधील मेदांता रुग्णालयाच्या संचालकांनी दिली होती. लालजी टंडन यांचे पुत्र आशुतोष टंडन यांनी सकाळी 7 वाजता ‘बाबूजी नहीं रहे’ असे ट्वीट करत लालजींच्या निधनाची दु:खद वार्ता दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.