मतदानासाठी प्रशासन सज्ज : तालुक्यात ३१५ केंद्र,२५५४ कर्मचारी नियुक्त

0

भुसावळ :-रावेर लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि.२३ एप्रिल रोजी पार पडणार्‍या मतदान प्रक्रियेसाठी भुसावळ विधानसभा क्षेत्रात तालुक्यात एकूण ३१५ मतदान केंद्र असून २५५४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ३ लाख ३ हजार ३०३ मतदार हक्क बजावणार आहे. तालुक्यात उपद्रवी व संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे व एक महिला केंद्र (पिंक बुथ) असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दि.२३ रोजी पार पडणार्‍या मतदान प्रक्रियेची प्रशासकीय तयारी पूर्ण झाली असून प्रशासन मतदान प्रक्रियेसाठी सज्ज झाले आहे. तालुक्यात ३१५ मतदान केंद्र आहेत. त्यातील शहरात १६९ तर ८ सहाय्यकारी मतदान केंद्र व १४६ ग्रामिण भागातील केंद्रांचा समावेश आहे. एका मतदान केंद्रावर सेक्टर ऑफिसर, केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारील व शिपाई, अंगणवाडी सेविका, बीएलओ, पोलिस यांच्यासह उमेदवारांचे प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. निवडणुक प्रक्रियेसाठी एकुण २५५४ कर्मचारी असे मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. तसेच मतदान प्रक्रियेसाठी ११४ विविध वाहने असतील त्यात २८ बस, जीप ८६, निवडणूक क्षेत्रिय अधिकारी ३५ यांचा समावेश आहे.
दरम्यान तालुक्यात एकही उपद्रवी व संवेदनशील केंद्र नसल्याची माहिती सुत्रांनी दिली. १६७७ दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आली असून ९०७ दिव्यांग मतदरांसाठी १६८ सहाय्यकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

६६ व्हीआयपी मतदार आहेत. दरम्यान, मतदान करण्यासाठी बाळासह आलेल्या महिलेजवळील बाळाला सांभाळण्यासाठी २६४ अंगणवाडी सेविकांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला केंद्र- तालुक्यात शहरातील प.क. कोटेचा महिला महाविद्यालयातील मतदान केंद्र क्र.१५ हे महिला (पिंक बुथ) केंद्र म्हणुन जाहीर करण्यात आले आहे. तीन लाख मतदार- ३लाख ३ हजार ३०३ मतदार असून यात १ लाख ४३ हजार ८०२ महिला, १ लाख ५९ हजार ४५७ पुरुष तर इतर मतदाराचा समावेश आहे.निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. निवडणुक अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. श्रीकुमार चिंचकर, तहसीलदार महेंद्र पवार, डिवायएसपी गजानन राठोड, यांच्या सह पोलिस अधिकारी व कर्मचारी कामकाज पहात असून प्रक्रियेवर नियंत्रण ठेवून आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.