मंत्री कपिल पाटील यांच्या जनआशिर्वाद यात्रेचे पेणमध्ये स्वागत

0

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑगस्ट पासून प्रारंभ झालेली जण आशिर्वाद यात्रा आज रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात दाखल झाल्यानंतर केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या या जन आशिर्वाद यात्रेचे पेणमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना कपिल पाटील यांनी जर आपल्याला केंद्रासह राज्यात देखील सत्ता आणायची असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या केंद्रातील प्रत्येक योजना आणि योजनेचे महत्व घराघरात पोहोचविण्याचा सल्ला दिला आहे.

यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या सोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री तथा पेणचे विद्यमान आमदार रविशेठ पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, रायगड जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते,नगराध्यक्षा प्रितम पाटील आदी उपस्थित होते.

मंत्रिपदाची शपथघेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आदेशानुसार ही जन आशिर्वाद यात्रा काढण्यात आली असून कपिल पाटील ठिकठिकाणी जाऊन जनतेचे आशिर्वाद घेत आहेत.यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केंद्रातील मोदी सरकारने जाहीर केलेल्या विविध योजनांचा पाढा वाचून या योजना आणि योजनांचा फायदा कार्यकर्त्यांनी घराघरात पोहोचवून जनजागृती केली तर केंद्रासह राज्यातही आपली सत्ता आल्याशिवाय राहणार नाही असे सांगितले.

त्याचप्रमाणे माझ्या मंत्रिपदाच्या खात्यातून 14 व्या वित्त आयोगातून 2 लाख 292 कोटी आणि 15 व्या वित्त आयोगातून 2 लाख36 हजार कोटी मंजूर केले आहेत.त्यामुळे गावागावाचा विकास करून गावे उज्वल करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे असे असे देखील कपिल पाटील यावेळी म्हणाले.

तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी काँग्रेसने कोकणाला कधीच झुकते माप दिले नाही आणि शिवसेनेने देखील कोकणाला काहीच दिले नाही, याउलट कोकणामुळेच शिवसेनेला सत्ता मिळाली आहे.मात्र कोकण हा भविष्यात भाजपचाच बालेकिल्ला असेल असे देखील दरेकर यांनी सांगितले. यावेळी आमदार रविशेठ पाटील यांनी देखील कार्यकर्त्यांना संबोधित करताना केंद्रात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा लवलेश नाही, केंद्रातील काम हे वाखाणण्याजोगे असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाला तोड नाही, त्यामुळे यापुढे देखील केंद्रात भाजपचीच सत्ता येईल असे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी यापूर्वी देशातील शेतकरी कमकुवत झाला होता, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट शेतकऱ्याच्या खात्यात पैसे टाकण्याचा निर्णय घेतल्याने आता शेतकरी सुखावला आहे. असे सांगत केंद्र सरकारच्या माध्यमातून पेण शहराला आणि पेण विधानसभा मतदारसंघाला भरघोस निधी देण्याची विनंती केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांना केली.

Leave A Reply

Your email address will not be published.