भुसावळ पालिकेत विवाह नोंदणीत दिरंगाई !

0

उपमुख्याधिकारी व नगरसेवकात तू-तू- मै-मै

भुसावळ (प्रतिनिधी)- येथील पालिकेत विवाह नोंदणीत दिरंगाई होत असल्याच्या नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आल्याने याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या नगरसेवक निर्मल (पिंटू) कोठारी यांना उपमुख्य अधिकारी यांनी आधी माझी वेळ घ्या मग बोला असे उत्तर दिल्याने दोघांमध्ये चांगलीच तू-तू मैं मै झाल्याचे बघायला मिळाले. दरम्यान  स्वत: नगराध्यक्ष व  नगरसेवकांनी हस्तक्षेप करुन या वादावर पडदा टाकला.

या बाबत अधिक माहिती अशी की, शहरात झालेल्या विवाहांची नोंदणी करण्यासाठी वधू, वर, वधूवर पक्षातील नातेवाईक, ब्राह्मण आदींना पालिकेत हेलपाटे मारावे लागत असल्याच्या तक्रारी वाढत होत्या. नोंदणीच्या प्रमाणपत्रावर केवळ एकाच अधिकाऱ्याला स्वाक्षरीचे अधिकार असल्याने व  संबंधित अधिकारी वारंवार  रजेवर  असल्याने ही नोंदणी रखडत असल्याने लक्षात आले.  पालिकेच्या स्थायी अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे अधिकार देण्यात यावेत, असा मुद्दा नगरसेवक निर्मल कोठारी यांनी उपमुख्याधिकारी सोमनाथ कोठूळे यांच्याकडे मांडला. यावर उपमुख्याधिकारी श्री. कोठूळे यांनी समाधानकारक उत्तर न देता नगरसेवक निर्मल कोठारींना आपण आधी वेळ घेवून माझ्याशी बोलावे, इतर कामांचा ताण अधिक  आहे असे  सांगत अपमानास्पद वागणूक दिली. यामुळे निर्मल कोठारींचा संताप अनावर झाला.  त्यांनी कोठूळे यांना खडे बोल सुनावत केवळ तुमच्या निष्काळजीमुळे नागरीकांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र घेण्यासाठी  पालिकेत हेलपाटे मारावे लागत आहेत,  यामुळे पालिका प्रशासन व शहराचे नाव खराब होते,  नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांना  नागरिकांसमोर मान खाली घालावी लागते असे सांगितले. यावरुन दोघांमध्ये  काही वेळ तू-तू मै-मै झाली.  वाद वाढत असल्याचे पाहून नगराध्यक्ष रमण भोळे, नगरसेवक युवराज लोणारी आदींनी कोठारी यांना शांत केले आणि  कोठूळे यांनाही जबाबदारीचे भान ठेवून बोलावे असे सांगितले. तसेच विवाह नोंदणीच्या कामात दिरंगाई करु नये, अशी समज दिली.

चुकीचे उत्तरे दिल्याने संताप – पिंटू कोठारी

विवाह नोंदणी प्रमाणपत्रावर स्थानिक अर्धात शहरात राहणाऱ्या अधिकाऱ्यांना स्वाक्षरीचे अधिकार द्यावेत, एवढीच  रास्त मागणी मी केली होती, मात्र उपमुख्याधिकारी कोठूळे यांनी प्रश्न समजून न घेता  अपमानास्पद उत्तरे दिली,  शहरात विवाह झाल्यानंतर विवाह नोंदणीसाठी मुलांना, मुलींना, पालकांना व नातेवाईकांना घेवून पालिकेत नोंदणी प्रमाणपत्रासाठी हेलपाटे घालावे लागतात.  यामुळे पालिकेच्या कारभाराचे वाभाडे निघतात. अधिकाऱ्यांच्या  नाकर्तेपणामुळे  नगराध्यक्षांसह आमच्या सर्वच नगरसेवकांचे नाव नाहक बदनाम होते.

Leave A Reply

Your email address will not be published.