भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन

0

नवी दिल्ली 

भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे आज  निधन झाले आहे. ते ६६ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यामुळे या दिग्गजाची प्राणज्योत मालवली आहे. यशपाल यांनी भारतीय संघाला पहिलावहिला विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. ते १९८३ च्या विश्वविजेत्या संघाचे भाग होते. या विश्वचषकातील वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्यांनी ८९ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले होते. तसेच उपांत्य फेरी सामन्यातही ६१ धावांचे योगदान दिले होते.

वर्ष १९७७-७८ मध्ये उत्तर विभागाकडून खेळताना यशपाल शर्मा यांनी दक्षिण विभागाविरुद्ध दुलिप ट्रॉफीत १७३ धावांची मोठी खेळी होती. ज्यामुळे त्यांची राष्ट्रीय संघातील निवडीची दारे खुली झाली होती. त्यानंतर त्यांची १९७८ साली पाकिस्तानविरुद्धच्या वनडे सामन्यात निवड झाली होती. तर, १९७९ साली कसोटीत निवड झाली होती.

१९७९ ते १९८३ यादरम्यानच्या कसोटी कारकिर्दीत यशपाल यांनी मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कामगिरी केली. त्यांनी १९७९च्या इंग्लंड दौऱ्यात कसोटीत चांगले प्रदर्शन केले होते. यावेळी त्यांनी ५८.९३ च्या सरासरीने ८८४ धावा केल्या होत्या. नवी दिल्ली येथील १९७९-८० च्या कसोटी सामन्यात यशपाल यांनी ऑस्टेलियाविरुद्ध महत्त्वाचे शतक ठोकले होते. तर, पुढील वर्षात मद्रास (आत्ताचे चेन्नई) येथे इंग्लंडविरुद्दच्या कसोटीत त्यांनी गुंडप्पा विश्वनाथ यांच्यासोबत मिळून ३१६ धावांची मोठी भागिदारी रचली होती. यातील १४० धावा यशपाल यांनी केल्या होत्या. इंग्लंड दौऱ्यानंतर १९८२-८३ मध्ये पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेतही यशपाल भारतीय संघाचा भाग होते.

मात्र, १९८३-८४ ला पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात त्यांचा फलंदाजी फॉर्म घसरला. ज्यामुळे त्यांना पुढे संघात सामील करण्यात आले नाही आणि नंतर त्यांनी कसोटीतून निवृत्ती घेतली. मात्र, तरीही पुढे काही काळ ते वनडेमध्ये खेळले. निवृत्तीनंतर यशपाल यांनी डिसेंबर २००५ पर्यंत राष्ट्रीय निवडकर्ता म्हणूनही काम केले आहे. त्यानंतर पुन्हा २००८ मध्ये त्यांची निवड समीतीत नियुक्ती झाली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.