…भाऊ तू मला शेवटचे पाणी टाकायला बोलावले का रे !

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

प्रत्येक माणसास मृत्यू हे अंतिम सत्य आहे.  मात्र ऐन तारुण्यात व उमेदीच्या काळात अकाली मृत्यु येणे ही फार दुःखदायक व मनाला चटका लावून जाणारी अशी घटना आहे.  त्यातच आई- वडिलांसमोर तरुण मुलाचा मृत्यू होणे ही तर फारच दुर्दैवी अशी घटना आहे. अशीच काहीशी घटना साकळी ता. यावल येथील कोळी परिवारावर  पडली आहे.

आई-वडिलांचा बत्तीस वर्षीय एकुलता एक मुलगा व दोघं बहिणींचा एकुलता एक भाऊ अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अंत्ययात्रेत बहिणींचा आर्त टाहो हा मन हेलावून टाकणारा होता. ” भाऊ तू मला शेवटचेच पाणी टाकायला बोलावले का रे ! ” हे बहिण सौ. मनिषाचे वाक्य ऐकून अनेकांचे डोळे पाणावले होते.

साकळी ता. यावल येथील भवानी पेठ भागातील रहिवासी असलेले रामलाल धोंडू कोळी यांना कैलास (वय-३२ ) नावाचा एकुलता एक मुलगा होता. कैलासचा मृत्यु होण्याअगोदर चार-पाच दिवस आधी त्याला घरीच अचानक डोकेदुखीचा त्रास जाणवला. दरम्यान त्याने लगेचच गावात उपचार घेतले,  मात्र त्याला डोकेदुखीचा त्रास जास्त जाणवू लागल्याने त्याला लागलीच दि. १२ रोजी जळगाव येथील डॉ. डाबी यांच्याकडे दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याला ब्रेन हॅमरेज त्रास झाल्याचे निष्पन्न झाले. डॉ.डाबी यांच्याकडे कैलासच्या डोक्याच्या भागात मोठी शस्त्रक्रियाही झाली.  मात्र त्याची तब्येत अधिकच खालवत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी त्याला दि.१४ रोजी मुंबई येथील जे.जे.रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दोन दिवस मोठ्या शर्तीने उपचार सुरू होते.  मात्र अखेर दि.१६ दुपारी तीन वाजता कैलासाची प्राणज्योत मालवली.  मयत कैलासचा जीवन- मरणाशी सुरु असलेला संघर्ष अवघ्या चार दिवसातच थांबला.घडलेल्या दुदैवी घटनेने संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मयत कैलासच्या पश्चात आई- वडिल,पत्नी व तेरा महिन्यांची मुलगी वंशिक‍ा तसेच तीन काका, आत्या यांचेसह मोठा परिवार आहे. वडील रामल‍‍ाल कोळी यावल महसुल विभागात नोकरीला असून मयत कैलास हा हिंगोणा ता.यावल येथील प्रा.आ.केंद्रात परिचर म्हणून सेवेत होता. त्याचा स्वभाव अतिशय प्रेमळ व मनमिळावू असा असल्याने तो संपूर्ण कुटुंबाचा तसेच मित्र परिवाराचा लाडका होता. एकूणच  कैलासचे अचानक जाणे हे सर्वांच्या मनाला चटका लावून जाणारे ठरले आहे.घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.