भडगांव पारोळा तालुक्यात बिबटयाचा उच्छाद

0

पेंडगावात 2 तर तामसवाडी परीसरात 1 वासराचा फडशा

जळगांव.दि.,5 –
भडगांवसह पारोळा तालुक्यातील तामसवाडी तरवाडे , पेंडगाव, शिदी, पथराड अशी काही गावे व सीमावर्ती भाग हा काहीसा वनपरीक्षेत्रानजीक येत असून सोमवारी रात्री उशिराने पेंडगाव-पथराडच्या जंगलालगत शेतकरी सहादू धर्मा पाटील यांच्या शेतात बांधलेल्या गायीच्या वासरावर बिबट्याने फडशा पाडला. यामुळे पारोळा-भडगाव या दोन तालुक्यांच्या सीमेवरील पेंडगाव, शिवरे, तामसवाडी, पथराड, रताळे आदी गावांतील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत आहे.
बिबट्याची मादी व तिचे दोन बछडे यांचा उपद्रव
गेल्या काही दिवसांत मादि बिबट्या व तिचे दोन बछडे यांचा परीसरात वावर असून उपद्रव वाढला आहे. यापरीसरात पारोळा वनविभाग तसेच भडगाव पाचोरा उपवनपरीक्षेत्र अधिकारी यांनी तत्काळ पिंजरे, कॅमेरे आदी लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी परीसरातुन केली जात आहे.
एक आठवड्यापुर्वी 28 जानेवारी रोजी पेंडगाव येथे तसेच 1 फेब्रुवारी रोजी तामसवाडी, ता.पारोळा व पुन्हा सोमवार 4 रोजी रात्री असे आठवडयाचे आत तीन दिवस मिळून या मादी बिबट्याने तीन गोजह्यांचा फडशा पाडला. वनविभागाने हे पंचनामे केले असले तरी पंचनाम्यावरच त्यांचे अडले असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. कारण बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असतानाच वनविभागाकडृन त्यास पकडण्यासाठी पिंंजरे, कॅमेरे लावणे आदी काही एक उपाययोजना करण्यात येत नसल्याने येथे संताप व्यक्त होत आहे.
या जंगलास लागून भडगाव तालुक्यातील पेंडगाव, पथराड,जुवार्डी,आडळसे तर पारोळा तालुक्यातील शिवरे,तामसवाडी,रताळे आदी गावे येतात. जंगल असल्याने या गावांमधून पशुपालनाचा व्यवसाय वाढला आहे. यामुळे गावाच्या लोकसंख्येच्या दुप्पट-तिप्पट पशुधन संख्या आहे. ही जनावरे शेतात-रानात उघड्यावरच बांधलेली असतात. बिबट्याचा या परीसररात संचार वाढल्याने पशुपालकांनी धास्ती घेतली आहे. दोनही ताल्ुक्यातील सीमाभागात आधीच दुष्काळाचे वातावरण आहे, त्यातच मादी बिबट्याचे हल्ले सुरुच असल्याने पशुधनाविषयीची भिती व्यक्त होत आहे. पशुधनाच्या रक्ताची चटक लागलेला बिबट्या उद्या रात्री-बेरात्री शेतावर जाणार्‍या शेतकर्‍यांच्या जीवावर देखिल बेतेल अशी भीती व्यक्त होत आहे.
जनावरे उघड्यावर बांधू नये
सदर बिबट्याची मादी बहाळ, ता.चाळीसगाव भागातून आली आहे. वनपरीसरात दुरवर पाणीसाठा नसेल . पाण्याच्या शोधात गावांच्या दिशेने आल्यानंतर शेतात उघड्यावर बांधलेल्या गुरांवर ती हल्ला करीत आहे. शेतकर्‍यांनी गुरे सुरक्षित जागी गावाजवळच बांधावीत ओसाड रानात वा शेतात बांधू नयेत. एक-दोन दिवसात कॅमेरे लावण्यात येतील. पिंजरा व तत्सम उपाययोजना विषयी मार्गदर्शन मागविले आहे.असे वनविभागातर्फे सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.