बहिणाबाई उद्यानाजवळील हॉकर्ससाठी पर्यायी जागा शोधा

0

आ. राजुमामा भोळे यांच्या मनपा अधिकाऱ्यांना सूचना

जळगाव :- महामार्ग प्राधिकरणाने राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी बहिणाबाई उद्यान व आयटीआय जवळील खाद्य पदार्थ विक्रेत्यांना दोन दिवसांत जागा खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी धास्तावलेल्या हॉकर्सनी गुरुवारी महापालिकेत धाव घेतली होती. यावेळी उपमहापौरांना निवेदन दिले होते. शुक्रवारी हॉकर्सने येवून आ. राजुमामा भोळे यांची भेट घेवून पर्यायी जागेची मागणी केली. यावेळी आ. भोळे यांनी शहर अभियंता सुनिल भोळे आदींना मनपाचे पर्यायी जागा शोधण्याच्या सूचना शुक्रवारी दिल्या. यावेळी माजी महापौर ललीत कोल्हे उपस्थित होते.

अनेकजण महामार्गावरील अपघाताला बळी पडलेले आहेत त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाची आवश्‍यकता आहे.त्याचप्रमाणे महामार्गानजीक असलेल्या खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर उपासमारीची टांगती तलवार आहे. यातून मधला मार्ग काढण्याचा प्रयत्न आ.भोळे करीत आहेत.

उद्यानासमोरील जागेला पसंती
बहिणाबाई उद्यानामागे 30 हॉकर्स आहेत त्यांनी उद्यानासमोरील जागेत दुपारी 4 ते रात्री 10 या वेळेत गाड्या लावू देण्याची परवानगी मागितली. मात्र तेथे आधीच फुटपाथ तयार करण्यात आला आहे. गाड्या जरी आखून दिलेल्या जागेत लावल्या तरी ग्राहकांची वाहने ही रस्त्यावर येणार आहेत त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होणार आहे. त्याचप्रमाणे आरटीओ कार्यालय व हॉटेल स्टेपइन समोरील जागेचा पर्यायही त्यांनी सूचविला.

नहीच्या अधिकाऱ्यांशी बोलणार
राष्ट्रीय महामार्गावरील सरसकट सर्वच हॉकर्सवर कारवाई न करता टप्पा टप्प्याने काम करा. म्हणजे पर्यायी जागा उपलब्ध करण्यास थोडा वेळ मिळेल, अशी मागणी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती यावेळी आ. भोळे यांनी केली. त्याचप्रमाणे आयटीआय जवळच असलेल्या एका रस्त्या व एकलव्य महाविद्यालयाजवळील त्रिकोणी जागेचाही विचार स्थलांतरासाठी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.