बंद घर फोडून साडे सात लाखांचा ऐवज लंपास, चाळीसगाव पोलीसांना चोरांचे आव्हान

0

चाळीसगाव :-(प्रतिनिधी) नातेवाईकाकडे बाहेरगावी लग्नाला गेलेल्या कापड व्यापाऱ्याच्या घरातील लॉकरमधून रोख रक्कम साडे चार लाख रूपये व सोन्याचे दागिने असा सुमारे 7 लाख 37 हजाराचा ऐवज चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. शहरातील जयबाबाजी चौकात घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील परिवार कलेक्शन चे मालक कपील दुर्गाप्रसाद अग्रवाल (42) हे जयबाबाजी चौक, चामुंडा माता मंदिर मागे  कुटुंबासह राहतात. दोन मजली घरात वरच्या मजल्यावर कपील अग्रवाल राहतात तर खालच्या तळमजल्यावर भाऊ प्रकाश अग्रवाल हे राहतात. दि.23 जून रोजी सकाळी 6 वाजता कपील अग्रवाल हे कुटुंबासह परतवाडा जि. अमरावती येथे नातेवाईकांकडे लग्नाला गेले.आज दि.25 रोजी पहाटे 4 वाजता गावाहून परत आले. घर उघडले असता घराच्या बेडरूममधील लाकडी वार्डरोब कपाटातील लॉकरचा दरवाजा तुटलेला दिसला.

तसेच कपाटातील सामान बेडवर अस्तव्यस्त पडलेले होते.कपाटातून चोरट्यांनी 45 हजार रूपये किंमतीच्या तीन तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, 75 हजार रूपये किंमतीचे पाच तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र, 35 हजार रूपये किंमतीचे अडीच तोळे वजनाचे सोन्याचे तीन टॉप्स,60 हजार रूपये किंमतीचे चार तोळे वजनाचे सोन्याचे फॅन्सी मंगळसुत्र, 15 हजार रूपये किंमतीचे एक तोळा वजनाच्या लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याच्या तीन चैन, 35 हजार रूपये किंमतीचे अडीच तोळे वजनाच्या पाच सोन्याच्या अंगठ्या, साडे सात हजार रूपये किंमतीची अर्धा तोळा वजनाची सोन्याची बिंदी, 15 हजार रूपये किंमतीची एक तोळे वजनाची एक सोन्याची कानातील साखळी व 4 लाख 50 हजार रूपयांची रोकड असा एकूण 7 लाख 37 हजार 500 रूपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

अशी झाली चोरी

दि.25 रोजी रात्री 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी घराच्या जीन्याच्या वर मजल्यावर येवून शुज रॅकवर ठेवलेली मुख्य दरवाजाची चावी घेऊन तिच्याने मुख्य दरवाजाचे लॉक उघडून बेडरूमधील लाकडी वार्डरोबमधील लॉकरमध्ये ठेवलेले वरील किंमतीचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कपील दुर्गाप्रसाद अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम 380,457 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वान पथक घुटमळले

दरम्यान या धाडसी चोरीची माहिती घरमालकाने शहर पोलीसांना दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली.तपासाच्या दृष्टीने श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले मात्र श्वान परिसरातच घुटमळले.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चोरीची जाणीव झाली पण भितीमुळे कुणाला सांगितले नाही

दरम्यान कपील अग्रवाल हे आज पहाटे गावाहून परत आल्यावर घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच भाऊ प्रकाश अग्रवाल यांना बोलावले. त्यांनी सांगितले की, मी बेडरूमध्ये झोपलेलो असतांना रात्री 1.30 ते 2 वाजेच्या दरम्यान भाऊ कपील यांच्या बेडरूममध्ये काहीतरी जड वस्तु खाली पडल्याचा आवाज आला.तसेच कोणीतरी आल्याची जाणीव झाली.परंतू मी व पत्नी घाबरलो असल्याने बाहेर आलो नाही किंवा कोणालाही कळविले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.