फडणवीस, चंद्रकांतदादा, दरेकर, शेलार पोलिसांच्या ताब्यात

0

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज भाजपकडून राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातल्या विविध ठिकाणी हे आंदोलन पार पडलं. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्या नेत्यांना ताब्यात घेतलं तसंच कार्यकर्त्यांचीही धरपकड केली.

नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज आंदोलन झालं. यावेळी फडणवीसांनी महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेल्याची घणाघाती टीका फडणवीस यांनी केली तसेच, आपल्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण घालवलं, ओबीसी आरक्षण घालवलं, पदोन्नतीतील आरक्षण घालवलं, असा आरोप त्यांनी केला. सरकारला येणाऱ्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घ्यायच्यात, असा आरोपही त्यांनी केली. आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं.

संपूर्ण महाराष्ट्रात आज आंदोलन होत आहे. ओबीसींचं आरक्षण राज्य सरकारमुळे गेलं. सरकारचा नाकर्तेपणा आता जनतेसमोर आलाय. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहणार आहे. जो पर्यंत महाराष्ट्र सरकार डाटा गोळा करणार नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. आंदोलनानंतर पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

भाजप नेते आशिष शेलार, गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा यांच्यासह शेकडो कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ओबीसी आरक्षण हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, रद्द झालेलं आरक्षण मिळालंच पाहिजे, अशा घोषणांनी भाजप कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी शेलार आणि महाजन यांनी राज्य सरकारवर तोफ डागली. सरकार ओबीसी आरक्षणविरोधी असल्याची टीका त्यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.