पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल; पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता ‘वर्षा’वर

0

मुंबई । पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतलं आहे. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

पोलीस आयुक्त गुप्ता यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री वन मंत्री संजय राठोड यांना भेटीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनंतर आता अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आणि आघाडीतील इतर नेतेही या प्रकरणी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं सांगत असल्याने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला असून मुख्यमंत्री याप्रकरणी आज दिवसभरात काही ठोस निर्णय घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.

 

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यापासून भाजप आक्रमक झालीय.पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांच्याविरोधात सबळ पुरावे असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री कसली वाट बघतायेत, त्यांच्या मुसक्या आवळा, असं म्हणत त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलीय. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.