पालकमंत्री मा.गुलाबराव पाटलांना घरचा आहेर ; शिवसैनिकाचा “अ”संतोष..

0

धरणगाव (प्रतिनिधी) – जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पाणीपुरवठा मंत्री मा. गुलाबराव पाटील यांना धरणगाव (धानोरा) येथील निष्ठावंत शिवसैनिक यांनी घरचा आहेर पाठविला आहे.

जळगांव जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून उपचारा अभावी, औषधा अभावी हजारो रुग्ण आपले प्राण सोडत आहेत, मात्र पालकमंत्री मा.गुलाबराव पाटील हे सर्व प्रश्न सोडवण्यात असमर्थ ठरल्यामुळे त्यांच्याबद्दल संपूर्ण जिल्ह्यात व धरणगाव शहरात प्रचंड अ”संतोष” निर्माण झाला आहे.

तालुक्यातील मतदारांनी मा.गुलाबराव पाटील यांना एक नव्हे तर तब्बल चार वेळेस भरघोस मतांनी निवडून दिले आहे. मागील शासनावेळी सहकार राज्यमंत्री, आता तर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री असून देखील, धरणगाव शहराचा अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित असलेला पाणीप्रश्न सुटलेला नाही. आजही धरणगाव शहरातील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. कोविड १९ परिस्थिती लक्षात घेता शहरासाठी ठोस उपाययोजना काहीच केलेल्या नाहीत. नुकतेच भाजपचे शहर व तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी कोविड, पाणी, व इतर विविध मागणी संदर्भात मा. जिल्हाधिकारी, मा.तहसीलदार व मा.मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेले आहे. आणि सद्या अकार्यक्षम पालकमंत्री म्हणून समाजमाध्यमांवर चर्चा केली जात आहे. धरणगाव व परिसरातील नागरिकांचे कामे होत नसल्याचा आरोप शिवसैनिक संतोष सोनवणे (माळी) यांनी घरचा आहेर म्हणूनच दिला आहे.

गेल्या १६ महिण्यापासून जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कारभार पाहणारे  मा.गुलाबराव पाटील यांनी कोणताही ठसा जळगांव जिल्ह्यात व धरणगाव तालुक्यात कामातून दाखवलेला नाही. त्यांचा जळगांव जिल्ह्याचा जनसंपर्क अत्यंत कमी आहे, ते मुंबई व जळगांव शहराच्या राजकारणातच रममाण असतात. जळगांव जिल्हा मराठा, माळी, लेवा पाटीदार, मुस्लिम, बौद्ध, तेली अशा विविध समाजाने नटलेला जिल्हा आहे, व धरणगाव तालुक्यात मराठा, माळी, लेवा पाटीदार, मुस्लिम समाज बहुसंख्य असल्यामुळे या भागाचे नेतृत्व करणारे पालकमंत्री मा. गुलाबराव पाटील यांनी सर्वसमावेशक कार्य करावीत, अशी कायम तालुकावासीयांना अपेक्षा असते. मात्र, गुलाब भाऊंनी विशिष्ट समूहातील कार्यकर्त्यांनाच मोठे केले आहे, व आपल्या फायद्याचे राजकारण करून निष्ठावंत शिवसैनिकांना व बहुसंख्य समाजाला सावत्रपणाची वागणूक दिली आहे. यामुळेच, मा.गुलाबराव पाटील धरणगाव तालुक्यातील बहुसंख्य समाजाकडून रोषाचे बळी ठरत आहेत.

सध्या कोरोनाच्या काळात विदारक परिस्थिती जळगांव जिल्ह्यात आहे. शेकडो लोकांचे उपचारा अभावी औषधा अभावी प्राण जात आहेत. ऑक्सीजन नाही रेमडीसिविर इंजेक्शन नाही. कोविड सेंटर नाही, लस नाही. प्रशासन अधिकारी पदाधिकारी यांचा समन्वय नाही. मा.पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा कंट्रोल नाही, यामुळे मृतांची संख्या प्रतिदिन वाढत आहे. यातच, एकट्या धरणगाव शहर व परिसरातील रुग्ण शेकडोंच्या संख्येने मयत झाले आहेत.

जिल्ह्यातील बहुतेक आमदारांनी स्वतःच्या मतदार संघात कोरोना सेंटर व रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून दिले, परंतु आपल्या मतदार संघातील मंत्र्यांनी फक्त आश्वासन देण्यापालिकडे काहीच दिले नाही. मा.गुलाबराव पाटील म्हणतात, तुला शिवसेना पक्षातून काढून टाकू, मला पक्षातून काढणारे कोण, कारण मला शिवसैनिक पद दिवंगत बाळासाहेबांनी दिलेलं आहे. मी कालही शिवसैनिक होतो, आजही आहे, आणि उद्याही शिवसैनिकच राहू आणि राहीलच.. असे संतोष सोनवणे (माळी) यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.