पाणीटंचाईच्या मुद्यावरुन अधिकार्‍यांना नगरसेवकांनी धरले धारेवर

0

जळगाव -शहरात सर्वत्र पाणीटंचाई, गळत्या,पाईपलाईन फुटण्याच्या कारणावरुन नगरसेवकांनी मनपाच्या अभियंत्यांना आढावा बैठकीत चांगलेच धारेवर धरले. तसेच अमृत योजनेच्या 65 टक्के कामाबाबतही संशय व्यक्त करण्यात आला.

महापौर सीमा भोळे यांनी पाणी टंचाईबाबत मनपाच्या सभागृहात बुधवारी दुपारी 4.30 वा. आढावा बैठक घेतली.यावेळी व्यासपीठावर उपमहापौर डॉ. अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, विरोधी पक्षनेते डॉ. सुनिल महाजन, गटनेते भगत बालाणी, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, रियाज बागवान आदी उपस्थित होते.

शिवाजीनगर पाण्याची टाकी लिकेजमुळे अडीच लाख लीटर पाणी वाया जाते असा आरोप बैठकीच्या सुरुवातीलाच नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी केला. यावर अभियंता तायडे यांनी  टाकी लिकेज नसून ओलावा आला असून टाकीला नळ दिला असल्याने गेंदालाल मिल येथील नागरिक पाणी भरतात अशी माहिती दिली. त्यावर दारकुंडेंनी वस्तुस्थिती तशी नसून नळ दिलेला नाही. जर पाणी गळत नसेल तर मी राजीनामा देतो अन्यथा तुम्ही द्या असे आव्हान अभियंता तायडे यांना केले. तेव्हा पुढील पाणी पुरवठ्याच्या दिवशी मी स्वत: जावून पाहणी करेन असे अभियंता डी.एस. खडके यांनी आश्वासन दिल्यावर वाद मिटला. सुप्रिम कॉलनीच्या मुद्यावरुनही नगरसेवक गणेश सोनवणे यांनी राजीनाम्याचा इशारा दिला.

ऑगस्टपर्यंत पाणी पुरेल- डी.एस. खडके

वाघुर प्रकल्पात 18 ते 19 टक्के जलसाठा आहे.  धरणात 43 दशलक्षघनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे. शहराची मागणी 42 दशलक्षघनमीटरची आहे. ऑगस्टपर्यंत पाणीसाठा पुरेल एवढे मुबलक पाणी आहे, अशी माहिती डी.एस. खडके यांनी दिली. शासनाकडून 60 मीटरपर्यंत पाईप टाकण्यास परवानगी आहे. मात्र पाण्याची पातळी ही 60 मीटरच्या खाली गेली आहे. त्यावर शहरातील विहिरींचा गाळ काढा अशा सूचना महापौर सीमा भोळे यांनी दिल्या. तर एकाही विहिरीचा गाळ काढला नसल्याची माहिती डॉ. सुनिल महाजन यांनी दिली.

व्हॉल्व्हमन पैसे घेतात – उज्वला बेंडाळे

पाणी पुरवठा विभागात किती कर्मचारी आहेत? असा प्रश्न विचारत. नगररचना विभागातील सुभाष चौधरी व बाबा साळुंखे या निष्णांत व्यक्तींची नेमणुक करा अशा सूचना देत व्हॉल्व्हमन अरेरावी करतात. फोन स्वीच ऑफ ठेवतात. नागरिकांकडून पैसे मागतात. परस्पर खोदकाम करुन पैसे घेतात, असा आरोप नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी केला.

नागरिक पाण्याचे जार विकत घेतात- ज्योती चव्हाण

शहरातील  वाढीव एरिया असलेल्या रायसोनी नगरात नागरिकांना पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घ्यावे लागतात. पाण्याच्या टाक्या साफ होत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

वाघूरची जलवाहिनी फुटली- प्रशांत नाईक

मेहरुण भागातील वाघूरची जलवाहिनी फुटल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे,अशी माहिती प्रशांत नाईक यांनी दिली. त्यावर सध्या लिकेज आहे फुटल्यावर दुरुस्त करू या खडकेंच्या उत्तरावर अ‍ॅड. दिलीप पोकळे, कुलभूषण पाटील आदींनी लोक पाण्यासाठी जागून काढत असताना तुम्ही मजाक उडवताहेत अशा शब्दात धारेवर धरले.

शहराची सेवा करा- विशाल त्रिपाठींचे आवाहन

आधीही अनेक समस्यांवर यापुर्वी महापालिका कर्मचार्‍यांनी मात मिळविली आहे. अनेकदा जागून शहराच्या समस्या मिटविल्या आहेत. सध्याही तेच कर्मचारी आहेत. मात्र आज काय झाले, कामे का करु शकत नाही? असा सवाल विचारत नगरसेवक विशाल त्रिपाठी यांनी सर्वात जास्त इंजिनियर असलेली जळगाव महापालिका आहे. कॅम्युनिकेशन गॅप कमी करा, समन्वय साधा. आर्थिक परिस्थिती एवढी कमी नक्कीच नाही भलेही नगरसेवकांचे चार महिन्यांचे पगार नका देवू पण पाण्याचा प्रश्न सोडवा शहराचे आपण देणे लागतो. शहराची सेवा करा असे भावनिक आवाहन त्रिपाठी यांनी केले.

उदय पाटीलांच्या अनुपस्थितीवरुन नाराजी

महापालिका इमारतीची स्वच्छतेबाबत आरोग्य विभागाला विचारून सभागृहात किती घाण झाली आहेे? असा सवाल डॉ. सुनिल महाजन यांनी विचारत आरोग्य अधिकारी बैठकींना नेहमीच गैरहजर असल्याबाबत प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली. तसेच एकमुस्त ठेक्याबाबत वॉटर ग्रेसवरही ज्योती चव्हाण यांनी आक्षेप घेतला. त्याबाबत अंतिम निर्णय नसल्याची माहिती उपायुक्त कहार यांनी दिली.

लेखी तक्रार का? आम्ही खोट बोलता का?

सर्वांबाबत लेखी तक्रार द्या असे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी सांगितल्यावर लेखी तक्रार का? आम्ही खोट बोलतोय का? असा सवाल उज्वला बेंडाळे, ज्योती चव्हाण यांनी उपायुक्तांना विचारला. तर नारायण खडके नामक व्हाल्व्हमन दारु पिऊन येतो. तो अभियंता खडकेंचा नातेवाईक असल्याने कारवाई होत नसल्याचा आरोप प्रशांत नाईक यांनी केला तर तो माझा नातेवाईक नसल्याचा खुलासा डी.एस. खडके यांनी केला. सदर कर्मचारी एक महिन्यापासून रजेवर असून त्याच्याजागी दुसरा व्हाल्व्हमन कार्यरत असल्याची माहिती विभागाने दिली. त्यावर त्याला शो कॉज बजावणार असल्याचे उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांनी सभागृहाला सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.