पाचोरा भडगावात १५ मे पासून सात दिवस कडकडीत जनता कर्फ्यू

0

पाचोरा (प्रतिनिधी) :  पाचोरा – भडगाव तालुक्यात कोरोना व्हायरसचा दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढतच चाललेला असल्याने कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी पाचोरा – भडगाव तालुक्यात ७ दिवस जनता कर्फ्यु पाळण्यासाठी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस (आय) चे प्रमुख पदाधिकारी व व्यापाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. सुरवातीस येत्या सोमवार पासून शनिवार पासून ७ दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचे ठरले होते.

मात्र १४ तारखेस ईद व अक्षय तृतीयाचा सण असल्याने ते ५ दिवस पुढे ढकलून अखेर १५ मे ते २२ मे पर्यंत शनिवार ते शनिवार असा ७ दिवस कडकडीत जनता कर्फ्यु पाळण्यासाठी सर्वांनी सहमती दर्शविली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस नगराध्यक्ष संजय गोहिल, जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पाटील, माजी उप जिल्हाप्रमुख गणेश पाटील, भरत खंडेलवाल, रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश भालेराव, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील उपस्थित होते. मागील वर्षी कोरोनाच्या कालावधीत ६० वर्षांवरील अनेकांचे कोरोना वायरसमुळे निधन झाले. मात्र दुसऱ्या टप्प्यातील कोरोना वायरस काळात ४० वर्षांवरील नागरिकांचे निधन होत असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर येत आहेत.

याशिवाय डब्ल्यूएचओ च्या अहवालानुसार येत्या जुलै महिन्यापासून तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तविली जात असल्याने या लाटेत लाखो बालकांना मोठ्या प्रमाणात संक्रमण होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे दुसऱ्या लाटेची साखळी तोडण्यासाठी व तिसरी लाट लोटण्यासाठी पाचोरा भडगाव तालुका वासीयांनी कडकडीत जनता कर्फ्यु पाळून आपले कुटुंब सुरक्षित ठेवण्यासाठी १५ मे ते २२ मे पर्यंत ७ दिवस सर्व व्यवहार बंद ठेऊन कडकडीत जनता कर्फ्यु पाळावा असे अहवाल बैठकी द्वारे करण्यात आले. मेडिकल व दवाखाने यांना पूर्णपणे वगळण्यात आले असून. दूध डेअरी सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे.

यावेळी उपस्थित व्यापारी प्रदीपकुमार संचेती व आयुब बागवान यांनी शहरात पोलीस व नगपालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करताना दुजाभाव करीत असून त्यांच्या ओळखीच्या दुकानदारांकडून केवळ २०० रुपये तर गोरगरीब व्यापाऱ्यांकडून ५०० रुपये दंड वसूल करीत आहेत. याशिवाय नगरपालिकेचे काही अधिकारी मुख्याधिकारी शोभा बाविस्कर या पथकांसह कारवाई करण्यासाठी बाहेर पडताच अधिकारी व कर्मचारी ओळखीच्या दुकानदारांना भ्रमधवणीद्वारे माहिती देऊन दुकाने बंद करण्याची माहिती पुरवीत आहे. पालिकेतील एक अधिकारी तर काही दुकानदारांकडून पैसे वसूल करून त्यांच्यावर दंड न करता सहज सोडून देत असल्याचे आयुब बागवान यांनी आमदार किशोर पाटलांकडे तोंडी तक्रार केली.

Leave A Reply

Your email address will not be published.