पद गेले मात्र, डॉ.जगवानींची मिरवून घेण्याची हौस कायम!

0

जळगाव (नाजनीन शेख) : लोकांनी लोकांच्या हितासाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही…‘लोकशाही’ची अशी व्याख्या केली जाते. मात्र, आता चित्र वेगळे आहे. समाजहिता पेक्षा राजकारणात सत्तेला महत्व आले… सत्ता प्राप्तीसाठी पैसा मार्ग बनला…आणि नेता बनण्यासाठीचे सर्वच गुण अनावश्यक ठरू लागले…प्रतिष्ठेसाठी राजकीय पक्ष अशाच ‘वजनदार’ नेत्यांची राजकीय सोय करू लागले…सामाजीक प्रतिष्ठा, मिरवायला भेटते म्हणून अनेक मोठ्या असामी, नेत्यांचे पायघोळ वस्त्र बनण्यात धन्यता मानू लागले…एकदा पद मिळाले की आयुष्यभर ‘मिरविण्या’चा परवानाच मिळत असल्याने अशा हौशी नेत्यांचा  राजकारणातील वावर हल्ली वाढला आहे.

महाराष्ट्राला दिशा देणार्‍या स्व.यशवंतराव चव्हाण, स्व.वसंतदादा पाटील यांच्या सारख्या दिग्गजांनी आपल्या अचरणातून लोकप्रतिनिधींसाठी काही अलिखीत नियमाचा पायंडा घालून दिला आहे. तो आजही अनेक नेते पाळत आहेत. मात्र, या हौशी नेत्यांना याचाशी काही देणे घेणे नसल्याचे सध्या चित्र आहे. असाचा हौशी चेहरा जळगावात समोर आला आहे. राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेले पद गेले तरी या महाशयांची मिरवून घेण्याची हौस आजून संपलेली नसल्याने ते चर्चेचा विषय बनले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाकिस्तानातून येवून भारतीय नागरिकत्व मिळविणारे डॉ.गुरूमुख जगवाणी यांचा राजकीय प्रवास आश्चर्यचकित करणाराच आहे. नागरिकत्व मिळाल्या मिळाल्या डॉ.जगवानी चर्चेत आले. राज्याच्या तत्कालीन राजकारणातील बाप माणूस एकनाथराव खडसे यांच्या मागेपुढे त्यांचा वावर वाढला. अतिशय नम्रपणे वागणार्‍या या विशेष कार्यकर्त्यावर नाथाभाऊंची मेहरनजर पडली आणि डॉ.जगवानी थेट विधानपरिषदेतच पोहचले. नाथाभाऊंच्या सुर्वण काळात डॉ.जगवानी यांचा दरारा काही औरच होता. नंतर राजकारणाची दिशा बदलली. नाथाभाऊंना पक्षाने अडगळीत टाकले. आता डॉ.जगवानींचीही दिशा आणि दशा बदलेल असे वाटत असतांनाच त्यांच्यावर पुन्हा पक्षाने कृपादृष्टी केली. महाराष्ट्र राज्य सिंधी साहित्य अकॅडमी मुंबईच्या कार्याध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. या पदाला शासनाने राज्यमंत्र्याचा दर्जा दिला होता हे विशेष. सिंधी साहित्यासाठी डॉ.गुरूमुख जगवानी यांनी कोणते योगदान दिले? हा संशोधनाचा विषय असला तरी त्यांच्या निवासस्थानी नामफलकावर राज्यमंत्री हे पदनाम मात्र,  मोठ्या दिमाखात झळकू लागले. विशेष म्हणजे ज्या पदामुळे त्यांना राज्यमंत्रीपदाचा दर्जा प्राप्त झाला त्या अकॅडमीचे नाव ठळक करण्याचे जाणीव पुर्ण टाळण्यात आले होते.

राजकारणातील फडणवीस आणि भाजपाचे वासे फिरले आणि महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. नव्या सरकारने आधीच्या सरकारने नियुक्त केलेल्या सर्वच नियुक्त्या रद्द केल्या. यात सिंधी साहित्य अकॅडमीचाही समावेश होता. अकॅडमीच्या नियुक्ती रद्द करण्यात आल्याच्या सुचनाही सर्वच पदाधिकार्‍यांना कळविण्यात आल्या. मात्र, डॉ.गुरूमुख जगवानी यांच्या निवास्थानावरील नामफलकावर आजही अतिशय ठळक अक्षरात राज्यमंत्री (दर्जा) ही ओळ तमाम जळगावकरांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक जण डॉ.जगवाणी यांच्यावर उपरोधाने टिका करीत आहेत. पद गेल्या नंतर डॉ.जगवानी यांनी स्वत: नामफलकावरील राज्यमंत्री हे पदनाम हटविणे गरजेचे होते. मात्र, मिरवून घेण्याची हैस पूर्ण न झाल्यामुळेच त्यांना आजही पद गेल्यावर सुध्दा आपण राज्यमंत्री म्हणून असल्याचे समाधान या नामफलकामुळे मिळत असावे अशीही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, पद गेल्या नंतरही अशा पध्दतीने राज्यमंत्री म्हणून मिरवून घेणे कायद्याच्या चौकटीत बसते का? बसत नसेल तर हा अपराध आहे काय? याचीही चौकशी प्रशासनाने करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.