8 मार्च रोजी मिळणार ‘खुशी का पासवर्ड’!

0

ब्रम्हाकुमारी शिवानी दीदींच्या कार्यक्रमाची तयारी पुर्ण : ‘लोकलाईव्ह’च्या चर्चेत ब्रम्हाकुमारी मिनाक्षी दीदी यांची माहिती

जळगाव (प्रतिनिधी) : दिवसेंदिवस आपल्या आयुष्यातून ‘खूशी’ गायब होत आहे. आयुष्यात सर्वकाही मिळते मात्र, ‘खूशी’ मिळत नाही. म्हणूनच आयुष्यात खुश कसे रहायचे याचा पासवर्ड सर्वसामान्य जळगावकरांना देण्यासाठी राष्ट्रपतींव्दारा सन्मानीत, राजयोगीनी ब्रम्हाकुमारी शिवानी दीदी 8 मार्च रोजी जळगावात येत आहेत. त्यांच्या ‘खूशी का पासवर्ड’ या कार्यक्रमाची तयारी पुर्ण झाली आहे. कार्यक्रमस्थळी प्रथम येईल त्याला प्रथम स्थान राहणार आहेत. याच दिवशी जागतिक महिला दिन असल्याने या सर्व कार्यक्रमाची जबाबदारी ब्रम्हाकुमारी दीदींना सोपविण्यात आल्याची माहिती ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयाच्या उपक्षेत्रीय निर्देशिका मिनाक्षी दीदी यांनी ‘लोकलाईव्ह’च्या चर्चेत दिली. याप्रसंगी माध्यम समन्वयक डॉ.सोमनाथ वडनेरे उपस्थित होते.

शिवानी दीदी यांच्या मार्गदर्शनातून अध्यात्मिक उर्जा, व्यक्तीमत्वाचा विकास आणि सकारात्मक उर्जा मिळत असते. त्यांच्या वाणीतून जळगाव जिल्ह्यातील नागरिकांचे आयुष्य बदलावे यासाठी त्यांना आम्ही त्यांना निमंत्रीत केले. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई का मैका होने के कारण जरूर आऊंगी असे म्हणत सुदैवाने त्यांनी आमचे निमंत्रण स्विकारले हे गौरवास्पद आहे. सध्या सर्वत्र दु:ख आणि अशांतीचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत शिवानी दीदींकडून जळगावकरांना ‘खूशी का पासवर्ड’ मिळणार असल्याचे मिनाक्षीदीदी यांनी सांगितले.

8 मार्च रोजी पहाटे 6.30 वाजेपासूनच शिवानी दीदींच्या कार्यक्रमाला सुरूवात होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममध्ये सकाळी 6.30 ते 8.30 ब्रम्हाकुमारी भाई आणि दीदींसोबत त्या वार्तालाप करणार आहेत. 10.30 ते 12.30 शिवानी दीदी जिल्ह्यातील डॉक्टर, वकिल, प्राध्यापक, उद्योजक, प्रतिष्ठीत नागरिकांशी संवाद साधतील. यानंतर दुपारी 3 वाजता केसीई संस्थेला भेट देवून तेथे त्या आशीर्वाद रूपी मार्गदर्शन करतील. यानंतर सायंकाळी 5.30 ते रात्री 9 यावेळेत शिवानी दीदी ‘खूशी का पासवर्ड’ या विषयावर मार्गदर्शन करणार असल्याचे मिनाक्षी दीदी यांनी सांगितले.

जगभरात अनेक विश्व विद्यालय आहेत. मात्र, ब्रम्हाकुमारी विश्व विद्यालय हे आगळेवेगळे ईश्वरीय विद्यालय आहे. याठिकाणी परमपिता हाच शिक्षक आहे. इर्शा, घृणा, आळस, काम, क्रोध यातून मुक्त करण्याचे शिक्षण स्वत: भगवानच देत असल्याचे सांगून प्रत्येक नराला नारायण आणि प्रत्येक नारीला लक्ष्मीदेवी बनविण्याचे शिक्षण या विश्वविद्यालयात दिले जात असल्याचे मिनाक्षी दीदी यांनी सांगितले.

माध्यम समन्वयक डॉ.सोमनाथ वडनेरे यांनी 8 मार्च रोजीच्या कार्यक्रमाची माहिती दिली. ‘खुशी का पासवर्ड’ कार्यक्रम सर्वांसाठीच खुला आहे. या कार्यक्रमाला गरिब श्रीमंत, स्त्री पुरूष असा कोणताही भेद नाही. कुणी खास नाही. म्हणूनच कार्यक्रम स्थळी जो पहिले येईल त्याला पहिले स्थान दिले जाणार आहे. नागरिकांनी या संधीचा लाभ घेवून आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘खुशी का पासवर्ड’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन शेवटी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.