पत्रकार पांडूरंग रायकरांच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक मदत द्यावी

0

पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी) : पुणे येथील कोरोना बाधित पत्रकार पांडूरंग रायकर यांना ऑक्सिजनची सुविधा वेळेत न मिळाल्यामुळे त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे आर्थिक स्वरूपात मदत मिळावी या, मागणीसाठी आज शुक्रवारी सकाळी १० वाजता पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे पहूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी ११ हजार रुपयांची मदत जाहीर करून मयत रायकर यांच्या कुटुंबियांना दिलासा दिला आहे . रायकर कुटूंबियांच्या बैंक खात्यात सदर मदत निधी जमा करण्यात येणार असून या कुटुंबाला सावरण्यासाठी दानशुर व्यक्तींनी यथाशक्ती आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

राज्यात सर्वत्र करोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे येथील TV 9 चे पत्रकार पांडुरंग रायकर यांना कोरोनाची बाधा झाली होती.त्यांच्यावर उपचार सुरू असताना ऑक्सिजनची सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याने दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला . घरातील कर्त्या व्यक्तीच्या अकाली  निधनाने त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक आधारच खचला असून त्यांच्या कुटुंबियांना शासनाने आर्थिक स्वरूपात मदत करावी या मागणीसाठी पहूर शहर पत्रकार संघटनेच्या वतीने  ज्येष्ठ पत्रकार शांताराम आप्पा लाठे यांच्या हस्ते लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी  शहर पत्रकार संघटना आणि  पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रायकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शंकर भामेरे, उपाध्यक्ष डॉ. संभाजी क्षीरसागर, सचिव जयंत जोशी, माजी अध्यक्ष शरद बेलपत्रे, मनोज जोशी, गणेश पांढरे, रविंद्र घोलप, रविंद्र लाठे, किरण जाधव, किरण जोशी, सादीक शेख यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, बीट हवलदार शशिकांत पाटील, सहाय्यक फौजदार अनिल अहिरे,  जगदीश चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.