नापिकीमुळे सातगाव येथील वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या

0

पाचोरा (प्रतिनिधी) : सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील वृद्ध शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करुन सदरची नोंद शुन्य क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलिसात वर्ग करण्यात आली आहे. सदर घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सातगाव (डोंगरी) ता. पाचोरा येथील संतोष धना पाटील वय – ६५ यांच्या मालकीची तीन एकर शेत जमिन असुन यावरील कपाशी पिक अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने, तसेच संतोष पाटील यांचेवर दोन लाखाच्या वर कर्ज असल्याने सदर शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांवर संकटा मागुन अनेक संकटे येत असतात. यावर्षी जुन पासुनच चांगला व सतत पाऊस होत असल्याने, पिके काही प्रमाणात चांगली होती. मात्र आता नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने पिके होत्याचे नव्हते झाली. तसेच मयत संतोष पाटील यांचेवर बँकेचे दोन लाखापेक्षाही अधिक कर्ज असल्याने, मयत संतोष पाटील हे नेहमी चिंताग्रस्त दिसायचे. याची दखल घेत त्यांची पत्नी त्यांच्यावर लक्ष ठेवून असायची. शेतात सुद्धा पत्नी नेहमी सोबत असायची. पण दि. २२ रोजी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतात पूर्णपणे चिखल असल्याने, पत्नीला म्हणाले की, शेतात चिखल असल्याने तू येऊ नकोस. मी जाऊन येतो शेतात. म्हणून मयत संतोष पाटील हे दि. २३ रोजी सकाळी शेतात एकटेच निघुन गेले. दुपार झाली तरीही आपले पती घरी न आल्याचे पाहून त्यांची पत्नी लिलाबाई शेतात पाहण्यासाठी गेल्या. पत्नीला शेताच्या बांधावर पती गयावया करतांना दिसले. त्यांना पाहताच पत्नीने मोठ्याने हंबरडा फोडला. रडण्याचा आवाज शेजारी शेतात असलेल्या मेहबूब फकीर यांनी ऐकताच त्यांचे दिशेने धाव घेतली. मेहबूब फकीर यांनी संतोष पाटील यांना बैलगाडीत टाकून गावात आणले. त्यांना तात्काळ पाचोरा येथील ग्रामिण रुग्णालयात रवाना करण्यात आले. संतोष पाटील यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी मृत घोषित केले.

मयताचे शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सदर व्यक्ती मायाळू आणि इतरांच्या कामात नेहमी सहकार्य करत असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मयताच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सहा मुली असा परिवार आहे. पाचोरा पोलिस स्टेशनचे हवालदार हंसराज मोरे यांनी पंचनामा करून, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, झिरो क्रमांकाने पिंपळगाव (हरे.) पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.