धडक कारवाई.. शेंदुर्णीच्या आठवडे बाजाराने घेतला मोकळा श्वास

0

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

शेंदुर्णीचा आठवडे बाजार पंचक्रोशीतील मोठा बाजार आहे. बुधवारी भरणाऱ्या या बाजारात नगरपंचायतीचे वतीने दुकानदारांना मोठे ओटे तयार करून दिलेले आहे. मात्र काही दुकानदार, व्यावसायिक, भाजीपाला विकणारे रस्त्याच्यामध्ये बसत यामुळे नागरिकांना, महिलांना त्रास होत असे, याची दखल घेत पहुरचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी नगरपंचायतीचे सहकार्य घेत आपल्या धडाकेबाज कारवाईने बाजाराचा कोंडलेला श्वास मोकळा केला असून यामुळे नागरिकांनी या कृतीचे कौतुक केले आहे.

शेंदुर्णीच्या नगराध्यक्षा विजयाताई खलसे, उपनगराध्यक्षा चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी, सर्व नगरसेवक, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे पोउनि. दिलीप पाटील पोलीस कर्मचारी यांनी यासाठी पुढाकार घेतला होता.

जेसीबीच्या सहाय्याने व्यवस्थितपणे बाजारात स्वतः पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी उभे राहुन आखणी करुन दिली. बाजाराच्या लगतच्या जागेची सुद्धा साफसफाई करुन घेत अनावश्यक झाडे, झुडपं, काट्या काढुन सपाटीकरण करुन घेतले. यामुळे आता जागाही छान मोकळी झाली आहे. या जागेचा वापर व्यावसायिकांना होणार आहे. बाजारात सुटसुटीतपणा आल्यानंतर आता पाकीटमार, तसेच भुरट्या चोऱ्या करणे यामुळे बंद होण्यास मदतच होणार आहे.

पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी बाजारातील व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, रस्त्याच्यामध्ये दुकान लावू नये, नागरिकांना, महिलांना बाजारात जाण्यासाठी रस्ता द्यावा, पाकीटमार चोरटे असतील तर पोलिसांना कळवावे. यावर जर कुणी अतिक्रमण करून दुकान लावून रहदारीस अडथळा निर्माण केला तर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी पोलीस कर्मचारी, नगरपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.