दोघा व्यापार्‍यांना जंगलात नेऊन लुटले; टोळी विरोधात गुन्हा दाखल

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भंगार दाखविण्याच्या नावाखाली दोघा व्यापार्‍यांना जंगलात नेऊन त्यांची सुमारे पावणेचार लाख रूपयात लुट करण्याची घटना नुकतीच घडली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतील भाईंदर येथील व्यापार्‍यास भंगार घेण्यासाठी भुसावळात बोलावण्यात आले. यानंतर व्यापारी व त्याच्या साडूला मुक्ताईनगर तालुक्यातील कंपनीत माल असल्याचे सांगून वाहनातून कुर्‍हा काकोडा जंगलात नेत टोळक्याने मारहाण केली. व्यापार्‍यांजवळील सोन्याची चैन, अंगठी व रोख २५ हजार आणि एटीएमचा वापर करून एकूण ३ लाख ७६ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना १४ ऑगस्टला घडली. याप्रकरणी संदीप वाणीगोटा यांच्या फिर्यादीवरून बुधवारी रात्री भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात १५ जणांविरूद्ध लुटीचा गुन्हा दाखल झाला.

भाईंदर येथील व्यापारी संदीप प्रभुलाल वाणीगोटा हे भंगार खरेदीचा व्यवसाय करतात. त्यांना काही जणांनी भंगार विक्रीसाठी संपर्क केला. यानुसार संदीप प्रभुलाल वाणीगोटा व त्यांचे साडू दिनेशकुमार चंपालाल जैन हे दोघे रेल्वेने मुंबई येथून भुसावळात आले. भुसावळ स्थानकाबाहेर घेण्यास आलेल्या वाहनातून संदीप वाणीगोटा व जैन या दोघांना मुक्ताईनगरला नेण्यात आले. तेथे जवळच कुर्‍हा काकोडा येथे कारखाना असून तेथील तांब्याचा माल पाहायचा आहे, असे सांगत दोघांना कुर्‍हा काकोडाच्या जंगलात नेण्यात आले.

यानंतर त्यांना कारमधून उतरवण्यात आले आणि तेथे दुचाकींवर आलेल्या सुमारे १५ जणांनी वाणीगोटा व जैन यांना मारहाण केली. त्यांच्याजवळील दोन्याचे दागिने, घड्याळ, मोबाइल व रोख २५ हजार रुपये हिसकावून घेतले. दोघांना मलकापूर नेत तीन एटीएम कार्ड हिसकावून रक्कम काढली. यात युनियन बँकेच्या एटीएममधून २४ हजार ६३०, आयडीबीआयच्या एटीएममधून १० हजार ५३० आणि महावीर एंजरप्रायजेस या खात्यातून आयडीबीआयच्या एटीएममधून १ लाख रुपये काढण्यात आले. या माध्यमातून त्यांची सुमारे पावणेचार लाख रूपयांची लुट करण्यात आली. ही घटना १४ ऑगस्ट रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली. यानंतर दोघांना मलकापूर रेल्वे स्थानकाजवळ सोडून चोरट्यांनी पोबारा केला.

वाणीगोटा व जैन यांनी रेल्वेने मुंबई गाठून तेथील पोलिसांना माहिती दिली. मात्र, त्यांनी भुसावळात गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. यानुसार वाणीगोटा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात बलवीर, विक्रम, शरीफ अशा १० ते १५ जणांविरूद्ध जबरी लुटीचा गुन्हा दाखल झाला आहे. डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल मोरे व सहकारी पुढील तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.