दीपनगरातील महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे आंदोलन तूर्त मागे

0

भुसावळ (प्रतिनिधी)- दीपनगरातील बंद संच आठवडाभरात पूर्ववत सुरू न केल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने दिला आहे. यापूर्वीदेखील आंदोलनाचा इशारा देण्यात आल्यानंतर सोमवारी मुख्य अभियंता पंकज सपाटे यांच्यासोबत महासंघाची बैठक होवून तूर्त आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष एम.डी.पाटील, निर्मिती विभागाचे केंद्रीय सचिव संजय आमोदकर, झोन अध्यक्ष योगेश ढाके, झोन सचिव अनंत जाधव, कोषाध्यक्ष सुनील पेढवी, सर्कल अध्यक्ष संजय तायडे, झोन संघटक एम.आर.पाटील आदी उपस्थित होते.

वीज निर्मिती दर कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चा
मुख्य अभियंता सपाटे यांनी संच कार्यान्वितीकरणासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले तसेच वीज निर्मितीचे दर कमी करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. औष्णिक केंद्रास कोळसा हा महाराष्ट्र किंवा महाराष्ट्राच्या जवळील कोल माईन्सचा द्यावा, अशी मागणी करण्यात आली होती तसेच कोल माईन्सकडून मिळणार्या कोळशाची प्रत ही थर्मल पॉवर स्टेशन केमिकल्स लॅबमध्ये केमिस्टकडून चेक केलेल्या प्रतीने ग्राह्य धरून त्याच आधारावर पेमेंट केले गेले पाहिजे व त्याच आधारावर कोळसा करार झाला पाहिजे शिवाय पॉवर स्टेशनमध्ये येणार्या कोळशाचे वजन करून त्या वजनानुसार कोळशाचे पेमेंट संबंधीत कोल माईन्सला अदा केले गेले पाहिजे, डीपी आर व नॉन डीपीआरच्या नावाने वरीष्ठ पातळीवरुन परस्पर कामे काढली जातात. तो प्रकार बंद करण्यात यावा झिरो डॅमरेजच्या नावाखाली कोळसा रेल्वे वॅगन्स मॅन्युअली रीकाम्या करण्यात येतात, हे प्रकार बंद झाले पाहिजेत. दोन बाय 500 मेगावॅट प्रकल्प वारंवार ट्रीपींग होतो, त्याचे कारण शोधून तेलावरील होणारा अधिक खर्च टाळावा जेणेकरुन एमओडी होणार नाही आदी प्रमुख विषयांवर चर्चा झाली. या चर्चेत मुख्य अभियंता पंकज सपाटे यांनी व्यवस्थापनाकडून मुख्यालयाकडे संच कार्यान्वित करण्याबाबतचा पाठपुरावा सुरू असून लवकरच संच कार्यान्वित होतील, असे आश्वासन दिल्याने महासंघाने तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.