दहशतवाद्यांना दिल्लीत पोहोचवण्यासाठी डीसीपीने घेतले लाखो रुपये !

0

नवी दिल्ली : जम्मू-काश्‍मीरच्या कुलगाम येथून हिजबुल मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांसह जम्मू-काश्‍मीर पोलीस दलाच्याच पोलीस उपअधिक्षकाला अटक करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. देविंदर सिंह असे या पोलीस अधिक्षकाचे नाव आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधिक्षक देवेंद्र सिंह यांनी दहशतवाद्यांना आधी चंदिगड आणि नंतर दिल्लीला सुरक्षित पोहोचवण्यासाठी लाखो रुपये घेतले होते. दरम्यान संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी अफजल गुरुसोबतही देवेंद्र सिंह यांचे संबंध होते अशी माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे अटक केलेल्या या पोलीस उपाधिक्षकाला राष्ट्रपती पदक पुरस्कारानेही गौरवण्यात आलेले आहे.

सुरक्षा दलाच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यातील काजीगुंडच्या मीर बाजार परिसरात दहशतवाद्यांसोबत कारने जात असताना देविंदर सिंह यांना ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत सैय्यद नवीद मुश्‍ताक उर्फनवीद बाबू आणि आसिफ राथर या दोन दहशतवाद्यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उपअधिक्षक देविंदर सिंह यांना गेल्यावर्षी 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती पुरस्काराने गौवरविण्यात आले होते. त्यावेळी ते जम्मू-काश्‍मीर पोलिसांच्या एन्ट्री हायजॅकिंग पथकात कार्यरत होते.

आता त्यांची नियुक्ती श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावर करण्यात आली होती. याआधी 2001 मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर देविंदर सिंह यांचे नाव चर्चेत आले होते. त्यावेळी ते पोलीस निरीक्षक असताना स्पेशल ऑपरेशन ग्रुपमध्ये सामील होते. अँटी टेरर ऑपरेशननंतर त्यांचे प्रमोशन झाले. त्यानंतर त्यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती.

दहशतवादी अफजल गुरुने कथितपणे देवेंद्र सिंह यांचं नाव घेतलं होतं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, देवेंद्र सिंह आणि अफजल गुरु यांच्यात नेमके काय संबंध होते याचा तपास सध्या सुरु आहे. जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी डीएसपी देवेंद्र सिंह यांच्या अटकेच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. दहशतवाद्यांप्रमाणेच त्यांचीही चौकशी केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे. देवेंद्र सिंह यांची सर्व सुरक्षा यंत्रणांकडून चौकशी केली जाणार आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेतलं जात असल्याचं विजय कुमार यांनी सांगितलं आहे.

सिंह यांना अटक केल्यानंतर तात्काळ त्यांच्या घरी छापा मारण्यात आला असता त्यांच्या घरी 5 ग्रेनेड आणि 3 एके 47 सापडल्या आहेत. अटक केलेल्या पोलीस उपअधिक्षकाकडे कसून चौकशी केली जात असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.