डंपिंग ग्राउंडवरील कचरा जाळल्याने वायु प्रदुषण, धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

खामगाव- कोरोना महामारीमुळे जनतेचे आरोग्य धोक्यात असतांनाच नगर पालिकेच्या हद्दीतील रावण टेकडी जवळील डंपिंग ग्राऊंडवर शहरातील कचरा जमा करून जाळून त्यात भर टाकण्यात येत आहे. धुरामुळे वायुप्रदुषण होऊन श्वसनाचे विकार असलेल्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

 

कचर्‍याची विल्हेवाट लावण्याकरिता जाणीवपुर्वक हा कचरा जाळण्यात येत आहे. त्यामुळे शहरासोबतच डंपिंग ग्राऊंड जवळ असलेल्या घाटपूरी, सजनपुरी, शिरजगाव देशमुख परिसरात विषारी धुर पसरत आहे. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास डंपिंग ग्राऊंडवरील कचर्‍याला आग लावण्यात आली. या आगीमुळे धुराळा निर्माण झाला होता. दुपारी 4 वाजेच्या सुमारास हा धुर शिरजगाव देशमुख, गोंधणापूर, माथणी ते गारडगाव शिवारापर्यंत पसरला होता. त्यानंतर रात्री 7 वाजता सजनपुरी, घाटपूरी नाका, गोपाळ नगर, मढी, सुटाळपुरा, फरशी या भागापर्यंत विषारी धुराने  संपुर्ण परिसराला विळख्यात घेतले.

 

दरम्यान संतप्त नागरिकांनी मुख्याधिकारी, तहसिलदार, एसडीओ यांना फोन करून सदरचा प्रकार लक्षात आणून दिला. त्यानंतर नागरिक हे डंपींग ग्राऊंडवर जमा झाले. यावेळी नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला. यानंतर याठिकाणी फक्त एक अग्निशामकची गाडी रात्री 9.30 च्या दरम्यान आली होती. परंतु आग व धुर मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे याचा काहीच फायदा झाला नाही. तर अजुनही धुर पसरत आहे. संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन ही समस्या सोडवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.