जिल्ह्यात रात्री बारापर्यंत ध्वनीक्षेपक वाजविण्याचे सण व उत्सव जाहीर

0

जळगाव : राज्य शासनाच्या 22 ऑगस्ट, 2017 च्या निर्णयानुसार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर, 2021 या कालावधीत ध्वनी प्रदुषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 चे नियम 5 (3) नुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापरावर श्रोतेगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी जिल्ह्याच्या निकडीनुसार सन 2021 वर्षामध्ये 15 दिवस निश्चित करून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याबाबत निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार पोलीस अधिक्षक, जळगाव यांनी जानेवारी ते डिसेंबर या काळात जळगाव जिल्ह्यात सालाबादप्रमाणे सण व उत्सव साजरे होणार असल्याचे कळविले आहे. त्याप्रमाणे यावर्षातील खालील साजरे होणारे सण आणि उत्सवांना सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सुट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहे.

रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वाजविण्यास सुट असलेले सण, उत्सव आणि त्यांच्या तारखा पुढीलप्रमाणे- छत्रपती शिवाजी महाराज जयंती- 19 फेब्रुवारी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती-14 एप्रिल, महाराष्ट्र दिवस-1मे, गणेशोत्सव पाचवा दिवस-14 सप्टेंबर, गणेशोत्सव सातवा दिवस- 16 सप्टेंबर अनंत चतुर्दशी- 19 सप्टेंबर, नवरात्रोत्सव अष्टमी-13ऑक्टोबर, नवमी-14ऑक्टोबर, ईद ए मिलाद- 19 ऑक्टोबर, दिपावली-4 नोव्हेंबर, ख्रिसमस-25 डिसेबर, वर्षअखेर-31 डिसेंबर. याशिवाय तीन दिवस राखीव ठेवण्यात आलेले आहेत.

ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी सूट देतांना मा. उच्च न्यायालयाने वेळोवेळी ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेल्या आदेशात नमूद बाबींचे तंतोतंत पालन करावे व मा. न्यायालयाकडील आदेशाचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ही सुट राज्य शासनाकडून घोषीत शांतता क्षेत्राला लागू नसल्याने त्याची जबाबदारी पोलीस अधिक्षक व आयुक्त जळगाव शहर महानगरपालिका यांची राहिल. ध्वनीक्षेत्रक व ध्वनीवर्धक वाजवण्याकामी सूट दिल्यानंतरि ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम 2000 मधील नियम 3 व 4 चे पालन करण्यात यावे. या नियमातंर्गत स्थापन केलेल्या प्राधिरणाने त्यांचेकडे प्राप्त तक्रारींवर मा. उच्च न्यायालयाने 16 ऑगस्ट, 2016 रोजी दिलेल्या आदेशाप्रमाणे विवित पध्दतीने कार्यवाही करणे आवश्यक आहे.

तरी जिल्ह्यातील नागरिकांनी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरासाठी मिळालेल्या सूटचा लाभ घेतांना नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.