जिल्ह्यात उद्यापासून ग्रा.पं. निवडणुकीची रणधुमाळी

0

जळगाव : जिल्ह्यातील सुमारे ७८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका प्रशासन सज्ज झाले आहे. बुधवार (ता. २३)पासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे. ग्रामीण भागात युवकांमध्ये निवडणुकीविषयी मोठा उत्साह दिसून येत आहे.

 

जिल्ह्यातील ७८३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीस मतदान होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती संबंधित तहसीलदारांनी केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्गही झाला आहे. सोमवार व मंगळवारी (ता. २२) निवडणूक प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयात टेबलाची मांडणी करण्यात येत आहे. सोमवारी बॅरिकेड्स लावण्यात येऊन मंडप टाकण्यात आला आहे. उर्वरित कामे मंगळवारी पूर्ण केली जातील. अर्ज तपासणी कक्ष, डिपॉझिट कक्ष, इतर कक्षाची उभारणी तहसील कार्यालयात सुरू करण्यात आली.

जळगाव तालुक्यात तहसीलदार नामदेव पाटील, निवासी नायब तहसीलदार दिलीप बारी यांच्या देखरेखीखाली निवडणूक कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. निवडणूक अर्ज ऑनलाइन भरावा लागेल. नंतर त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात प्रिंटसह इतर कागदपत्रे द्यावी लागणार आहेत. निवडणूकप्रक्रियेत तहसील कार्यालयात ४३ टेबले मांडण्यात येणार आहेत. त्यात ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २३ तारखेपासून निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.

 

जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायती

जळगाव तालुक्यात महत्त्वपूर्ण व लोकसंख्या दहा हजारांवर असलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका यंदा होणार आहेत. यामुळे ग्रामीण भागात तरुणांत जोश आहे. जळगाव तालुक्यात ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यात शिरसोली प्रबो, शिरसोली प्र.न., नशिराबाद, जळगाव खुर्द, कुसुंबा, चिंचोली, रायपूर, कंडारी, असोदा, आव्हाणे, ममुराबाद, फुफनगरी, रामदेववाडी, तरसोद, मन्यारखेडे, उमाळा, वडनगरी, भादली बुद्रुक, कडगाव, भोकर, कठोरा, आवार, सावखेडा बुद्रुक, लमांजन प्रबो, रिधूर, आवार, शेळगाव, म्हसावद, वडली, मोहाडी, वावडदे, जवखेडे आदी.

Leave A Reply

Your email address will not be published.